राजापूर : माजी मंत्री भाई हातणकर यांच्यानंतर राजापूर तालुका काँग्रेसची जबाबदारी सांभाळणारे माजी आमदार गणपत कदम यांनी काँग्रेसचा त्याग करून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची डळमळीत झालेली नौका आता कोण सावरणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.नऊ वर्षांपूर्वी शिवसेनेचा त्याग करुन नारायण राणेंसमवेत काँग्रेसमध्ये दाखल झालेले सेनेचे तत्कालीन आमदार गणपत कदम यांनी नंतर आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन २००९ साली काँग्रेसमधून पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांनी विजयही संपादन केला होता. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास राजापूर तालुका सेनेचा बालेकिल्ला होता. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती आणि नगर परिषदांसहीत ग्रामपंचायतीवर सेनेचेच वर्चस्व होते. मधल्या एक दशकाच्या कालखंडात पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा एकही सदस्य नव्हता. गणपत कदमांसमवेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रत्येकी तीन सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राजापूर नगर परिषदेमधील शिवसेनेचे पाच आणि चार अपक्षांनी त्यावेळी काँग्रेस प्रवेश केल्याने सेनेच्या हातातील सत्ता उलथून नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आली होती. कदम यांनी सत्ताधारी काँग्रेसचा आमदार म्हणून चार वर्षे प्रतिनिधीत्व केले.मात्र, पक्षांतर्गत त्यांची परवड होत होती. ज्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस प्रवेश केला, त्या नारायण राणेंचीच पक्षात घुसमटत होतेय म्हटल्यावर आपले काय, असा विचार करत कदम यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. त्यामुळे आता काँग्रेसचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.यापूर्वी माजी मंत्री ल. रं. हातणकर यांनी राजापूर तालुका काँग्रेसची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. गणपत कदमांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ती आपोआप कदमांच्या खांद्यावर येवून पडली. नऊ वर्षांच्या कालखंडात स्वत: कदम यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, जुना-नवा वाद इथेही सुरु राहिला आणि त्यांना डावलले गेले. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीतून कदमांनी पक्षत्याग केला आहे. त्यामुळे शिवसैनिकांत उत्साह पसरला असताना तालुका काँग्रेसला मात्र तो जोरदार धक्का मानला जात आहे. त्यामुळे आधीच बाळसं घेणारी काँग्रेसी नौका नावाड्याच्या शोधात आहे.विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिफे, प्रदेश प्रवक्ते हरिश रोग्ये, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर आदी मंडळींपैकी तालुका काँग्रेसचा अस्थिर झालेला डोलारा सांभाळण्याची जबाबदारी कोण पार पाडतो. त्यावरच पक्षाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. (प्रतिनिधी)
गणपत कदमांच्या पक्षत्यागाने काँग्रेस डळमळीत
By admin | Published: August 28, 2014 9:01 PM