खेड : तालुक्यातील कुंभाड येथील मूळ रहिवासी असलेले रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विजय भोसले यांचे (६२) प्रदीर्घ आजाराने सोमवारी ५ जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात वेगळी ओळख होती.नाबार्डमध्ये नोकरी सांभाळून ॲड. विजय भोसले यांनी उमेदीच्या काळात नाबार्डच्या युनियनचे सरचिटणीस पद सांभाळले होते. तरुणपणी त्यांच्यावर काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव पडल्यामुळे पक्षाचा सक्रिय समर्पित कार्यकर्ता म्हणून खेड तालुक्यात काम करण्यास सुरुवात केली.
खेड तालुक्यात त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अनेक राजकीय घडामोडींमध्ये आपला मतप्रवाह टिकवून ठेवू शकला. त्यांच्या अभ्यासू व एकनिष्ठ कार्यप्रणालीमुळे पक्षश्रेष्ठींनी रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये त्यांना काम करण्याची संधी दिली. जिल्हा काँग्रेसचे दीर्घकाळ सरचिटणीस पद संभाळल्यानंतर ॲड. भोसले यांच्यावर दोन वर्षांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. जिल्हास्तरावर त्यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनही करण्यात आली. कोरोनाच्या काळातही ते सक्रीय होते. समाजकारण व राजकारणात काँग्रेस पक्षाचे स्थान अबाधित ठेवण्याचा त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केला. त्यांच्या निधनाचे वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात धडकताच अनेकांनी शोक व्यक्त केला.