चिपळुणात कृषी व कामगार विधेयकाविरोधात काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 PM2021-03-26T16:41:10+5:302021-03-26T16:42:43+5:30
Congress Chiplun Ratnagiri- केंद्र सरकारने केलेल्या जाचक कृषी व कामगारविरोधी कायद्याविरोधात काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उपोषण छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. उपोषणादरम्यान रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली.
चिपळूण : केंद्र सरकारने केलेल्या जाचक कृषी व कामगारविरोधी कायद्याविरोधात काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उपोषण छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. उपोषणादरम्यान रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली.
शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला बराच काळ होऊन गेला तरी केंद्र सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. यामुळे केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी काँग्रेसतर्फे उपोषण छेडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर चिपळूण कॉंग्रेसतर्फे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली युवक कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम यांच्या महामार्गालगत शिवसागर हॉटेल शेजारील कार्यालय परिसरात उपोषण छेडण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मनोज शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही एक प्रकारे हुकमशाही आहे. या हुकूमशाहीचा लवकरच अस्त होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल. कॉंग्रेस पक्ष गांधी, नेहरूंच्या विचारांवर आजही वाटचाल करीत आहे. कॉंग्रेसच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते याची जाणीव देशातील जनतेला होऊ लागली आहे, असे ते म्हणाले. या उपोषणाला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.