चिपळूण : महाविकास आघाडीची रचना त्रिदेवाप्रमाणे करण्यात आली आहे. या तीन भावडांप्रमाणे एकत्रित राहून विधानसभा निवडणूकीला सामोरे जायचे ठरले आहे. त्यात लहान मोठा कोणी असला तरी त्यात एकमेकांना साभांळून घेण्याची गरज असताना काँग्रेस संपली असे म्हटले जात असेल तर तुम्ही मित्रपक्ष कसले. कालच्या बैठकीला आपण उपस्थित असतो, तर हे आरोप सहन केले नसते. तेथेच त्याची प्रतिक्रिया उमटली असती. काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना काँग्रेस काय आहे हे विधानसभाच नव्हे, तर आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही पहायला मिळेल, असा इशारा काँग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी आढावा बैठकीत दिला. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचाराबाबत आढावा घेण्यासाठी काँग्रेसची स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बेटकर यांनी उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे नाव न घेता त्यांच्या खेर्डी येथील जाहीर सभेतील वक्तव्याचा रोजदार समाचार घेतला. बेटकर म्हणाले की, महाविकास आघाडी एकदिलाने विधानसभा निवडणुकीचे कामकाज करीत आहेत. प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता झटून काम करत आहे. असे असताना काँग्रेसचे अस्तित्व काय, काँग्रेस संपली अशा वल्गना मित्र पक्षाकडून केल्या जात असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. अन् तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात बेटकर यांनी सुनावले. यावेळी तालुकाध्यक्ष लियाकत शाह, संगमेश्वर तालुकाध्यक्ष दत्ता पारकर, तालुका उपाध्यक्ष संजय जाधव, रफीक मोडक, सेवादल जिल्हाध्यक्ष टी डी पवार, यशवंत फके, महिला जिल्हाध्यक्षा विभावरी जाधव, संगमेश्वर महिला तालुकाध्यक्षा मिताली कडवइकर, चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव आदी उपस्थित होते.
भास्कर जाधवांचे काँग्रेसविरोधात वक्तव्य, काँग्रेस नेत्याने दिला इशारा; म्हणाले..
By संदीप बांद्रे | Published: November 13, 2024 5:27 PM