लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : पूरपरिस्थितीचा अंदाज व मदतीचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शहरातील परांजपे हायस्कूल येथे बैठक झाली. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांच्या दौऱ्याची पूर्वकल्पना न दिल्याच्या रागातून काही पदाधिकाऱ्यांनी चक्क जिल्हा प्रवक्त्यांना धारेवर धरले. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न काहींनी केल्याने काँग्रेसच्या या राडेबाजीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.
दोन दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चिपळूण दौऱ्यावर आले होते. मात्र, ते पत्रकार परिषद सोडून अचानक निघून गेले. हा प्रकार चर्चेत असतानाच आता या राडेबाजीमुळे चिपळूण काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काँग्रेस नेते हुसेन दलवाई व आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी व शहर पदाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागासाठी पक्षाकडून मदतीची मागणी केली. त्यानुसार दलवाई यांनी पक्षाकडून पूरग्रस्तांसाठी मोठी मदत येणार आहे. मदत वाटपासाठी सज्ज राहा, असे आवाहन केले. मात्र, त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या चिपळूण दौऱ्याची पूर्वकल्पना न दिल्याने तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकाराला जिल्हा प्रवक्ते अशोक जाधव यांना जबाबदार धरल्याने वादंग निर्माण झाला. त्यातून जाधव यांच्या अंगावर काहींनी धावून जाण्याचा प्रयत्न केल्याने दलवाई यांनी संबंधितांना खडे बोल सुनावले. काँग्रेसची ही संस्कृती नाही. त्यामुळे अशा गोष्टी पक्षात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असेही सुनावल्याची चर्चाही सुरू आहे.
--------------------
ग्रामस्थ धावले
चिपळूण शहरातील परांजपे हायस्कूल येथे काॅंग्रेसतर्फे पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या नियाेजनाबाबत बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. यावेळी वाटपाच्या विषयावरून सुरू झालेली चर्चा थेट ऊर्जामंत्र्यांच्या दाैऱ्यापर्यंत जाऊन पाेहाेचली. त्यानंतर सभागृहात वादंग निर्माण झाला. त्याचा आवाज एवढा हाेता की, आजूबाजूचे ग्रामस्थही काय झाले हे पाहण्यासाठी धावून गेले. त्यामुळे हायस्कूलच्या बाहेर ग्रामस्थांची गर्दी झाली हाेती.