चिपळुणात काँग्रेसचा महागाई विरोधात एल्गार, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 07:02 PM2022-08-05T19:02:28+5:302022-08-05T19:03:16+5:30
केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत अवघा परिसर दणाणून सोडला.
चिपळूण : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढलेली महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ केल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत अवघा परिसर दणाणून सोडला.
केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीमध्ये केलेली वाढ यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने घाईघाईत सुरू केलेल्या भारतीय सैन्यातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. एकूणच महागाईमुळे सर्वसामान्यांचे जीवन मेटाकुटीला आले असून, सामान्य जनता हैराण झाली आहे. केंद्र सरकारचा कारभार उद्योजक व बड्या कारखानदारांनाच पोषक राहिला आहे. परंतु, देशातील सामान्य नागरिकांसाठी हे धोरण मारक ठरत आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवनही महागाईमुळे अडचणीत आले आहे, असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, ईब्राहीम दलवाई, अन्वर जबले, अशोक डाकवे, करामत मिठागरी, राकेश दाते, वासूअप्पा मेस्त्री, यशवंत फके, माजी नगरसेविका सफा गोठे, महिला तालुकाध्यक्षा निर्मला जाधव, अश्विनी भुस्कुटे, रविना गुजर आदी सहभागी झाल्या होत्या.