कोकणात काँग्रेसला धक्का; चिपळूणातील माजी नगरसेवकांनी 'हातात' घेतली 'ढाल तलवार'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:44 AM2023-02-16T11:44:20+5:302023-02-16T11:45:37+5:30
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी पार पडला पक्षप्रवेश सोहळा
चिपळूण : येथील सहा माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या गटात प्रवेश केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवास्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी दापोलीचे आमदार योगेश कदम, चिपळूणचे बांधकाम व्यावसायिक नासिर खोत हे उपस्थित होते. काँग्रेसचे चार, तर शिवसेनेच्या दोन माजी नगरसेविकांचा यामध्ये समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून चिपळूणमधील काही माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र संबंधित नगरसेवक सातत्याने ते नाकारत होते. अखेर मंगळवारी 'व्हॅलेंन्टाईन डे' च्या मुहूर्तावर हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ सदस्य माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, करामत मिठागरी, हारून घारे, संजीवनी शिगवण काँग्रेसच्या या ४ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
तसेच चिपळूणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका स्वाती दांडेकर व संजीवनी घेवडेकर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. दापोलीचे आमदार योगेश कदम व चिपळूण मधील नासिर खोत यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला.
चिपळूणात काँग्रेसचे एकूण ६ नगरसेवक होते. त्यापैकी कबीर कादरी व सफा गोठे या २ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्यास नकार देत मूळ पक्षाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे एकूण १२ नगरसेवक होते. त्यापैकी २ नगरसेविकांनी शिंदे गटाची वाट धरली, तर अन्य सर्वजण मात्र पक्षाबरोबर राहिले आहेत. मात्र आगामी काळात आणखी काही माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची श्यक्यता वर्तवण्यात येत आहे.
भरभक्कम आश्वासने
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण शहरासाठी भरभक्कम आश्वासने दिली. ते म्हणाले हे सरकार तुमचे आहे. तुम्हीच आम्हाला सत्तेवर बसवलेले आहे. त्यामुळे तुमच्या हिताचेच निर्णय आम्ही घेत आहोत, असे नमूद करत चिपळूण मधील ब्ल्यू आणि रेड पुररेषा संदर्भात लवकरच बैठक घेऊन कायमस्वरूपी निर्णय घेतला जाईल. तसेच येथील गाळ उपशाला गती देण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी सरकार लागेल तितका निधी देण्यास तयार आहे. चिपळूण शहराचा विकास झपाट्याने व्हावा यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पक्षाने त्यांना न्याय दिला होता. भरपूर संधी दिली होती. पुढे देखील त्यांना पक्षाकडून न्याय देण्याची आमची भूमिका होती. परंतु अचानक त्यांनी असा निर्णय का घेतला हे समजू शकलेले नाही. त्यांचा हा निर्णय दुर्दैवी आहे. - लियाकत शहा, शहराध्यक्ष