लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पंतप्रधान उज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करून काही अटींमध्ये सवलतही देण्यात आली आहे.. कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. मात्र, नंतर या कुटुंबांना गॅस भरावा लागणार आहे. गॅसच्या किमती वाढल्याने अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस सिलिंडर परवडणारा नसल्याने दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबे आता चुलीकडे वळली आहेत.
केंद्र सरकारने ग्रामीण जनतेची चूल बंद व्हावी, या उद्देशानेही योजना दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी सुरू केली होती. या लोकांना जोडणी आणि सिलिंडर मोफत दिला असला तरी गॅसचा वापर त्यांना करावा लागणार आहे. सद्य:स्थितीत एका सिलिंडरसाठी ८३५ रुपये मोजावे लागत आहे. अल्प उत्पन्न असलेल्यांना गॅस वापरणे परवडणारे नाही. त्यामुळे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी चुलीकडे वळले आहेत.
..............................
सिलिंडर भरणे कसे परवडणार?
आम्ही रोजगारावर जगणारी माणसं. सरकारने मोफत सिलिंडर दिला. मात्र, आता गॅस भरण्यासाठी एवढे पैसे कुठून आणणार? रोज दर दिवशीच मिळतो, असे नाही. त्यामुळे सरकारने कनेक्शन मोफत दिले असले तरी गॅस भरण्यासाठी पैसे कुठून आणणार?
त्यापेक्षा चूलच परवडली.
- सावित्री वडके, करबुडे, ता. रत्नागिरी
..........................
चार-पाच वर्षांपूर्वी सरकारने गावांमध्ये राॅकेल आणि चुलीचा वापर होऊ नये, म्हणून उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी आणि सिलिंडर दिले होते. त्यावेळी सबसिडीही मिळत होती. मात्र, आता सबसिडीही नसल्याने नुसता गॅस सिलिंडर घेऊन करणार काय, गॅस भरायला एवढे पैसे आणायचे कुठून? त्यामुळे आता चूलच परवडते.
- आशा जाधव, देवरूख