रत्नागिरी : सलग पडलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांची पावले काेकणाकडे वळली आहेत. पर्यटकांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पसंती दिली आहे. जिल्ह्यातील गणपतीपुळे, दापोली, गुहागर तालुक्यांतील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. किनाऱ्यालगत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.सलग तीन दिवस आलेल्या सुट्या, त्याचबराेबर नाताळाची पडलेली सुटी यामुळे अनेक जण पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पर्यटकांनी सर्वांत जास्त पसंती काेकणाला दिली आहे. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांनी पर्यटकांना आकर्षित केले आहे. लगतच्या जिल्ह्यांसह विविध भागांतील पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील श्रीक्षेत्र गणपतीपुळेसह आरेवारे, दापाेली व गुहागरातील समुद्रकिनारे गजबजून गेले आहेत.दिवसभरात जिल्ह्यात किमान ३५ ते ४० हजार पर्यटक येत आहेत. त्यामुळे हाॅटेल्स, लाॅजिंगमध्ये गर्दी होत आहे. ऑनलाइन सुविधेचा लाभ घेत ऐनवेळी रात्र होऊ नये यासाठी आगाऊ आरक्षण करण्यात येत आहे.गणपतीपुळे सुमारे ३० हजार भाविकश्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिरात दिवसभरात २५ ते ३० हजार भाविक दर्शनासाठी असल्याचे मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आले. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी रांगेत भाविकांना मंदिरात सोडण्यात येत हाेते. सुरक्षिततेसाठी मंदिर व परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता.
आसपासच्या गावातून गर्दीअनेक पर्यटक गणपतीपुळ्यात राहत असताना काही पर्यटक गणपतीपुळेच्या आसपासच्या गावांत निवासासाठी थांबत आहेत. त्यामुळे मालगुंड, नेवरे, काजिरभाटी, आरे-वारे येथील निवासव्यवस्थेसाठी पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे. काजिरभाटी, आरे-वारे, मालगुंड किनाऱ्यावरही पर्यटकांची गर्दी झाली हाेती.
पाच तारखेपर्यंत गर्दीनाताळाची सुटी ५ जानेवारीपर्यंत असल्याने ३१ डिसेंबरनंतर ५ तारखेपर्यंत ही गर्दी राहणार आहे. अनेक पर्यटक दोन-चार दिवसांच्या निवासासाठी येत आहेत. तर, काही पर्यटक सकाळी येऊन सायंकाळी माघारी फिरत आहेत.
वाहनांची कोंडीगणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढल्याने वाहने लावण्यावरून पर्यटकांमध्ये वाद होत आहेत. अरुंद रस्त्यांमुळे वाहनांची कोंडी होत आहे. गणपतीपुळे गावातील हाॅटेल परिसरात वाहने लावण्यासाठी सुविधा आहे. परंतु, मंदिरापर्यंत अनेक भाविक येत असल्याने वाहनांची गर्दी वाढत असून, वाद टाळण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागत आहे.
वाळूत गाडी रुतलीमुरुड (ता. दापाेली) येथील समुद्रकिनारी एका पर्यटकाची चारचाकी वाळूत रुतली हाेती. रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. ग्रामस्थांच्या मदतीने ही गाडी बाहेर काढण्यात आली.