मेहरुन नाकाडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील चिंचखरी येथील हेमंत फाटक गेली ३९ वर्षे शेती करीत असून गेली दहा वर्षे तरी शंभर टक्के सेंद्रिय पध्दतीने शेती करीत आहेत. सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब फाटक यांनी केला आहे. पावसाळी भातशेती, भातशेतीनंतर कडधान्य व उन्हाळी बागायतीतून उत्पन्न मिळवित आहेत.
पारंपरिक पध्दतीने भातशेती करीत असतानाच सुभाष पाळेकरांच्या नैसर्गिक पध्दतीने प्रभावित झालेल्या फाटक सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.
गेली पाच वर्षे त्यांनी भाताच्या दहा जातींचे संवर्धन केले आहे. कसदार आणि दर्जेदार तांदळाची ते विक्री करीत आहेत. नैसर्गिक शेती व्यवस्थापनामुळे त्यांनी निर्माण केलेल्या आरोग्यदायी तांदळाला वाढती मागणी आहे.
नैसर्गिक शेती करतानाच एकाच जातीचे भात बियाणे न वापरता वेगवेगळी बियाणे लागवडीसाठी वापरत आहेत. त्यात पारंपरिक भात बियाणांपासून संशोधन केंद्राने विकसित केलेल्या नवीन बियाणांचाही समावेश आहे. इंद्रायणी, वाडाकोलम, घनसाळ, काळं भात, सारथी, खारल (स्थानिक लाल भात), दोडक (लाल भात), रत्नागिरी ७ आणि अशा वाणांचे संवर्धन केले आहे.
दोनशे नारळ, शंभर हापूस व शंभर केशर आंब्याची लागवड केली आहे. केशरची लागवड मात्र त्यांनी घनपध्दतीने केली आहे. कोणतेही रासायनिक खत न वापरता घन जीवामृत, जीवामृत आणि आंबट ताकाचा वापर ते करत आहेत.
वेगवेगळी लागवड
शेती करीत असतानाच पाळेकर यांचा प्रभाव पडल्याने नैसर्गिक शेतीकडे फाटक वळले आहेत. भातामधून मोठे उत्पादन मिळण्याची अपेक्षा न ठेवता आरोग्यदायी तांदूळ पिकविण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दहा वेगवेगळ्या जातीच्या बियाणांची लागवड यशस्वीपणे सुरू आहे.