आॅनलाईन लोकमत
देवरूख (जि. रत्नागिरी), दि. १७ : संगमेश्वर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची इमारत प्रशासनाने ताब्यात घेतलेली नाही. यामुळे दोन कोटी खर्चातून उभी राहिलेली ही इमारत सध्या विनावापर पडून आहे. तसेच ज्याठिकाणी सध्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहे ती इमारतही अत्यंत धोकादायक बनली आहे. नवीन इमारत लवकर ताब्यात घेतली न गेल्यास याविरोधात जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा आयटीआय संघर्ष समितीचे अध्यक्ष गणेश चाचे यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. २००९पासून येथील आयटीआय इमारतीचे बांधकाम सुरू आहे. अनेक अडीअडचणींनंतर या इमारतीचे काम पूर्र्ण झाले आहे. मात्र, इमारत पूर्ण झाल्यानंतरही तिचा ताबा घेण्यास आयटीआय प्रशासन नकार देत आहे. या इमारतीतील काही सुविधा अपूर्ण असल्याने तिचा ताबा घेण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे काम पूर्ण केले असून, आयटीआयने इमारतीचा ताबा घ्यावा. त्यानंतर अपूर्ण असलेल्या सुविधा त्वरित पूर्ण करून देऊ, असे आश्वासन बांधकाम विभाग देत आहे.
या दोघांच्या शीतयुध्दामध्ये विद्यार्थ्यांना जुन्या व धोकादायक इमारतीतच शिक्षण घ्यावे लागत आहे. तर नवीन इमारत विनावापर पडून आहे. प्रशिक्षण केंद्राचे स्थलांतर नवीन इमारतीत व्हावे, यासाठी आयटीआय संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष चाचे यांनी वर्षभरापासून आयटीआय स्थलांतरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वारंवार आयटीआय प्रशासन, बांधकाम विभाग यांच्याकडे संघर्ष समितीकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, आयटीआय प्रशासन व बांधकाम विभाग आपआपल्या भूमिकांवर ठाम आहेत. आता संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांंना निवेदन देत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी आयटीआय व बांधकाम विभागाबरोबर घेतलेल्या बैठकीत स्थलांतराबाबत सूचना दिली होती. मात्र, त्यानंतरही आयटीआय प्रशासन व बांधकाम विभाग आपल्या आडमुठ्या धोरणावर ठाम आहेत.