रत्नागिरी : संपर्क युनिक फाउंडेशन संस्थेतर्फे समाजातील निराधार, गोरगरिबांना मदत देण्यासाठी गयावळवाडी येथील आपला बाजार येथे मदत संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.
समाजातील काही कुटुंबांना आजही दोन वेळचे जेवण मिळत नाही. त्यासाठी शहरातील मॉलमध्ये संपर्क साधून संपर्क युनिक फाउंडेशनतर्फे मदत संकलन केंद्र स्थापन केले आहे. संकलित केलेल्या वस्तू निराधार कुटुंब, अनाथाश्रम वृद्धाश्रम, महिलाश्रम, दिव्यांग वसतिगृह, आदी ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. या मदत संकलन केंद्राचा प्रारंभ आशादीप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप रेडकर, डॉ. चंद्रशेखर जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, जिल्हा अध्यक्ष नीलेश नार्वेकर, तालुका अध्यक्ष जमीर खलफे, सचिव युसूफ शिरगावकर, सल्लागार नारायण बोराटे, महिला संघटक फातिमा नाकाडे, महिला संघटक ॲड. सुप्रिया सावंत, रुग्ण मदत केंद्रप्रमुख ईस्माइल नाकाडे, मंगेश मसूरकर उपस्थित होते. हा उपक्रम लवकरच शहरातील इतर मॉलमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी सांगितले.