लांजा : अपघातानंतरन्यायालयात तारखांना हजर राहत नसल्याने लांजा न्यायालयाने काढलेल्या अटक वाॅरंटनंतर लांजा पोलिसांनी कंटेनर चालकाला राजस्थानातील अजमेर येथून अटक केली. त्याला लांजा न्यायालयासमोर हजर केले असता पंधरा दिवसांचा साधा कारावास आणि सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा अपघात हा २०१४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ (ता. लांजा) येथे झाला होता. कंटेनर चालक किसन लाल सिंग (५०, रा. अजमेर राज्य राजस्थान) असे चालकाचे नाव आहे. तो कंटेनर (एमआर ६१, बी ३४५५) घेऊन गोवा ते अहमदाबाद असा चालला होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने समोरून येणाऱ्या मॅजिक गाडी (एमएच ०४, इएक्स २९२०) या गाडीला धडक दिली होती. या धडकेत मॅजिक गाडीतील प्रमोदिनी प्रमोद अडूरकर (४०) आणि दुर्वास प्रमोद आडुळकर (१२, दोघे रा. पालशेत, गुहागर) यांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले होते. या प्रकरणी कंटेनर चालक किसन लालसिंग याच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ४२७ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर या अपघात प्रकरणी लांजा न्यायालयात सुनावणी सुरू होती. मात्र, न्यायालयात तारखेला लालसिंग हा वारंवार गैरजर राहत होता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वाॅरंट काढला होता. यानुसार पोलिस निरीक्षक दादासाहेब गुड्डूकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप साळुंखे, कॉन्स्टेबल गिरी गोसावी व हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे यांनी संबंधित कंटेनर चालकाची माहिती घेऊन राजस्थान अजमेर येथे जाऊन त्याला अटक केली. त्यानंतर सोमवारी (२६ जून) सायंकाळी सर्वजण लांजा येथे दाखल झाले. मंगळवारी (२७ जून) किसन लाल सिंग याला लांजा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १५ दिवसांचा साधा कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
लांजातील अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाला राजस्थानातून अटक
By अरुण आडिवरेकर | Published: June 28, 2023 11:32 AM