राजापूर : राजापूर शहर आणि तालुका परिसरात रविवारपासून मान्सूनच्या पावासाने चांगलाच जोर धरला आहे. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर पावसाने संततधार धरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नदीकिनाऱ्यालगत असलेले व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. रविवारी तालुक्यात १२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर तालुक्यात एकूण ४९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हवामान खात्याने १० ते १२ जून या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली हाेती. मात्र, या दोन दिवसांत तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी हाेते. मात्र, रविवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही संततधार पावसाचा तडाखा बसला. राजापूर शहरातील गुजराळी येथील श्रीदेव लक्ष्मी नारायण गणपती देवस्थानाच्या मागील संरक्षण भिंत कोसळली आहे. राजापूर–बुरंबेवाडी रस्त्यावर पाणी आले असून, गोवळ तेलेखन बुरंबेवाडी रस्त्यावरील पन्हळेतर्फ राजापूर येथील मोरी एका बाजूने खचली आहे, तर उन्हाळेमार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरीवर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आठ-दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनंतर सोमवारी सकाळी राजापूर शहर बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, संततधार पावसामुळे त्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेकांनी लागलीच काढता पाय घेत घर गाठले. दरम्यान, संततधार पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे.
शासनाने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस ‘हाय अलर्ट’ घोषित केला आहे. नागरिकांनी या दोन दिवसांच्या काळात कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे, तर वादळी वाऱ्यामुळे पडझड होण्याची शक्यता असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.