खेड : तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात गेल्या २४ तासांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, १२२.१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. सकाळी पावसाचा जाेर काहीसा कमी झाल्याने जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले हाेते.
खेड तालुक्यात गेले दोन दिवस पावसाने संततधार लावली असून, आतापर्यंत १५६२.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र, जुलैच्या पहिल्या १० दिवसांत पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. खेड तहसीलदार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील सात महसूल मंडळ कार्यालयांतर्गत एकूण ८५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये खेड -१०४ मिलिमीटर, शिर्शी ११७, भरणे ९८, आंबवली १५५, कुळवंडी १२०, लवेल १४९ व धामणंद मंडलात ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वांत जास्त पावसाची नोंद आंबवली मंडलअंतर्गत झाली असून, सर्वांत कमी पाऊस भरणे मंडलअंतर्गत झाला आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाचा परिणाम एस.टी. वाहतुकीवर झालेला नाही. खेड-बिरमनी वस्तीची फेरी वगळता उर्वरित सर्व फेऱ्या नियमित सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. सोमवारी (दि. १२) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमाराला खेड-दापोली मार्गावर सुर्वे इंजिनिअर येथे नारिंगी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सवणस- अणसपुरे, तळे-म्हसोबावाडी व घेरा रसाळगड हे दरड प्रवण क्षेत्रातील रस्ते असून, तालुक्यातील इतर सुमारे २५ रस्त्यांवर खड्डे पडल्याने ते नादुरुस्त झाले आहेत.
---------------------------------
खेड तालुक्यातील नारिंगी नदीला आलेल्या पुराचे पाणी सोमवारी सायंकाळी खेड-दापोली मार्गावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.