रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात ज्या ठेकेदाराचे काम बरोबर नाही किंवा ज्याने बिलकूल काम केलेले नाही अशांवर सक्त कारवाई करणार, असे ठेकेदार बदलता येतात का त्याची चाचपणी होईल, असे रत्नागिरीचे पालकमंत्रीअनिल परब यांनी म्हटले आहे.पालकमंत्री झाल्यानंतर अनिल परब प्रथमच सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. चांगले काम करणाऱ्यांना काम दिले जावे ही आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५ वर्षापूर्वी शिवसेनेकडून महाआघाडीचा प्रस्ताव आला होता, असा गौप्यस्फोट केला आहे. यावर बोलताना त्यांनी याबाबतच्या प्रस्तावाची माहिती मला नाही, अशी चर्चा झाली याची माहिती आम्हाला नाही, असे सांगत परब यांनी चव्हाणांचा दावा अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला.मुंबईच्या नाईट लाईफ बाबत बोलताना परब म्हणाले की, कुठलीही गोष्ट चर्चेशिवाय होत नाही. गृहमंत्र्यांनी फक्त याबाबत म्हटले आहे. मात्र. या विषयी चर्चा झालेली नाही. ती चर्चा होईल. नाईट लाईफ स्टाईलच्या प्रस्तावाला विरोधकांचा विरोध राजकीय आहे. नाईट लाईफची संकल्पना समजून घेतली पाहिजे. नाईट लाईफ म्हणजे अय्याशी किंवा व्यभिचारी कृत्य नाही, असे परब यांनी म्हटले आहे.