चिपळूण : उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड व गुहागर या पाच तालुक्यांतील कोरोना चाचणीसाठी येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब टेस्टींग लॅब उपलब्ध केली होती. अवघ्या २४ तासांत २ हजार चाचण्या करण्याची क्षमता या लॅबची होती. मात्र, आता लॅबनेच गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उत्तर रत्नागिरीला वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कोरोना चाचणीचे अहवाल दहा दिवसांनी प्राप्त होत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा ससंर्ग वाढतोच आहे. याआधी स्वॅब तपासणीचे ५ हजार नमुने प्रलंबित राहत होते. यावर उपाय म्हणून चिपळुणातील कामथे कोविड सेंटरमध्ये स्वॅब तपासणी लॅब मंजूर झाली. या लॅबचे काम सुरू झाले. लॅबमध्ये २४ तासात २ हजार स्वॅब तपासणीची क्षमता होती. त्यामुळे केवळ चिपळूणच नव्हे तर उत्तर रत्नागिरीतील पाचही तालुक्यांना या लॅबचा फायदा होईल, असे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीपासूनच या लॅबमध्ये २४ तासांत जेमतेम साडेतीनशेच नमुने तपासले जात होते. त्यामुळे ही लॅब काहीशी वादग्रस्त बनली होती. यावरून संतप्त झालेल्या आमदार भास्कर जाधव यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींस यात झोलझाल खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना या लॅबकडे लक्ष देण्याची सूचना केली होती. त्यावेळी संबंधित कंपनीने कामकाजात सुधारणा होईल, असे सांगितले होते. परंतु त्यानंतरही या लॅबच्या कामकाजात बदल झाला नाही. अखेर या लॅबचे काम थांबवण्यात आले आहे.
-------------------------
तपासणी अहवाल विलंबाने
सध्या ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच कोरोना चाचणीचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मात्र, लॅब नसल्याने उत्तर रत्नागिरीतील आरटीपीसीआर तपासणीचे नमुने रत्नागिरीत पाठवावे लागत आहेत. त्यामुळे काहींचे अहवाल आठ ते दहा दिवसांनी मिळत आहेत. परिणामी संबंधित रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल उशिरा येत असल्याने तोपर्यंत प्रसारिक म्हणून काम करीत आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तूर्तास डेरवण रुग्णालयाच्या लॅबमधून तपासणी करून घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू आहे.