साखरपा : शिमगोत्सव साधेपणाने साजरा करुन आनंद द्विगुणित करा, पण त्याचबरोबर कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी जनतेने सहकार्य करून कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांनी केले.
संगमेश्वर पंचायत समितीचे सभापती जयसिंग माने यांनी पदाधिकाऱ्यांसोबत शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोविड १९ संदर्भात साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना काेराेनाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. बुरंबी, सायले, निवे खु., देवळे व सायंकाळी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन शिमगोत्सवात कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी, यासंदर्भात माहिती दिली.
यावेळी नायब तहसीलदार के. जी. ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेरॉन सोनावणे, गटविकास अधिकारी (गट अ) नरेंद्र रेवंडकर, जिल्हा परिषदेच्या माजी बाल कल्याण सभापती रजनी चिंगळे, पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, कोंडगाव सरपंच बापू शेट्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट आदाते, परिसरातील सरपंच, ग्रामकृतीदल, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आदी कोविड १९ चे नियम पाळून उपस्थित होते.