जिल्ह्यात गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. जानेवारी, फेब्रुवारी आणि १५ मार्चपर्यंत ही संख्या कमी होती. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय, असा दिलासा नागरिकांबरोबरच आरोग्य यंत्रणेलाही वाटू लागला होता. मात्र, शिमगोत्सवात गावाला येणाऱ्या चाकरमान्यांमुळे हा धोका वाढणार आहे, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्याकडून नागरिकांना सातत्याने देण्यात येत होत्या. मात्र, शिमगोत्सवासाठी बाहेरून येणारे आणि जिल्ह्यातीलही नागरिक यांच्याकडून दाखविण्यात आलेल्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा धोका वाढला. परिणामी, रुग्णसंख्या भरमसाट वाढू लागली. १ ते १५ मार्च या कालावधीत २८७ असलेली संख्या १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ वर पोहोचली. १५ दिवसांत ५२१ नव्या रुग्णांची भर पडली. तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत नव्या रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. १८ मार्च २०२० ते १६ एप्रिल २०२१ या कालावधीतील एकूण रुग्णसंख्या आता १४,५६० वर पोहोचली आहे. प्रत्येक दिवशी आदल्या दिवशीच्या संख्येत १०० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडू लागली आहे. सध्या रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहता एप्रिलअखेर ही संख्या दुपटीपेक्षा अधिक होण्याचा धोका व्यक्त होत आहे.
शिमगोत्सवासाठी येणाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने लसीकरण तसेच कोरोना चाचणी करून येणे बंधनकारक केले होते. मात्र, तरीही या नियमांचे उल्लंघन करून आलेले थेट घरात पाेहोचले. त्यामुळे महिनाभरात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. शिमगोत्सवाच्या काळात कोरोनाचा चढता आलेख पाहता १६ मार्च ते १६ एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत तब्बल ४,३२९ नवे रुग्ण सापडले आहेत. अजूनही तपासणीसाठी पुढे येणाऱ्यांची संख्या कमी असल्याने कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत ४२९ जणांचे मृत्यू झाले आहेत. आता दिवसाला सहाशे पेक्षाही जास्त रुग्ण सापडू लागल्याने आता आरोग्य यंत्रणेवर अधिकाधिक ताण येत आहे.
१) एप्रिलमध्ये हाहाकार
१८ मार्चपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांकडून कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्यामुळे १६ ते ३१ मार्च या कालावधीत ७८८ इतकी झाली. तर १ ते १६ एप्रिल या कालावधीत ही संख्या ३५४१ वर पोहोचली. १६ मार्च ते १६ एप्रिल या एक महिन्यात तब्बल ४३२९ इतके नवे रुग्ण वाढले. तर या महिन्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे.
२) वाढती रुग्णसंख्या चिंताजनक
जिल्ह्यात १६ एप्रिल अखेर १९४२ इतके रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी १०६४ रुग्ण गृह विलगीकरणात असून उर्वरित जिल्ह्यातील विविध शासकीय, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील चार कोरोना रुग्णालयात ३५०, सात कोरोना आरोग्य केंद्रात (डी.सी.एच.सी.) ११७, आणि १० कोविड केअर सेंटरमध्ये (सी.सी.सी.) ४११ रुग्ण उपचार घेत आहेत.
३) जम्बो कोविड सेंटर
वाढती संख्या पाहाता आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी अधिक खाटा निर्माण करणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभारण्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी केली. त्यादृष्टीने आता जलद गतीने पावले उचलण्यात येत आहेत.