अडरे : चिपळूण तालुक्यातील कामथे नं. २ जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक यशवंत चंद्रकांत पेंढाबकर यांनी कोरोना काळात मानवी शरीराला गुणकारी असणारा बुस्टर डोस आयुर्वेदिक चहाचा काढा देण्यास सुरुवात केली आहे. दिवसभर चिपळूण शहरात त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते हा चहा मोफत देत आहेत. या चहा काढ्याची चिपळुणात जोरदार चर्चा सुरू आहे.
पाेलीसमित्र म्हणून मार्च २०२० पासून ते ड्युटीवर लागले़, तेव्हापासून बंदोबस्त असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आयुर्वेदिक काढा देण्यास सुरुवात केली. आपल्या दुचाकीवरून रस्त्यात जे जे कोणी ओळखीचे, अनोळखीचे भेटेल त्यांना चहा घेता का, असे आदरपूर्वक विचारून, एक कप चहा अगदी मोफत देतात़. दिवसभरातून दोन ते तीन वेळा ते घरी चहा बनवतात. यातून सुमारे ४० ते ५० कप चहाचे दिवसभर वाटप होते़.
चिंचनाका येथे सेवेत असणारे पोलीस, होमगार्ड यांच्यासह बाजारपेठ, बस स्टँड परिसर, पागनाका, देसाई बाजार याठिकाणी ते चहाचे वाटप करतात़.
यशवंत पेंढाबकर यांचे सामाजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. मागील वर्षीपासून त्यांचे कोविड योद्धा म्हणून काम आम्ही जवळून पाहत आहोत. सध्याच्या काळात माणसाच्या शरीरातील इम्युनिटी पॉवर वाढवण्याचे काम ते करत आहेत, असे मत राजू जाधव यांनी व्यक्त केले़
---------------------------------------
चिपळुणात यशवंत पेंढाबकर हे आयुर्वेदिक चहाच्या काढ्याचे वाटप करतात. यावेळी राजू जाधव, संजय जोशी, राकेश कोलगेही उपस्थित हाेते.