लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने जेवढे प्रयत्न केले, तेवढेच प्रयत्न त्या-त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील १३० गावांपैकी १०७ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला, तरी अजूनही २३ गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. यामध्ये विशेषतः तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांना मोठे यश आले आहे. बहुतांशी गावातील ग्रामस्थही आता कोरोना विषयी जागरूक झाले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर आजतागायत प्रशासन ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे. तालुक्यात आतापर्यंत ३१०३ इतके कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २७७० रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ११२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत तब्बल २२१ रुग्ण कोरोना बाधित आहेत. यामध्ये शहरी भागातील रुग्ण संख्या अधिक आहे.
ग्रामीण भागातील सावर्डे विभागात सर्वाधिक ४९ रुग्ण असून त्यापाठोपाठ वहाळ, अडरे, रामपूर व खरवते प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रुग्ण संख्या अधिक आहे. तसेच अडरे विभागात मृत्यू दर अधिक असून आतापर्यंत या विभागात २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील १७ गावांपैकी १५ गावांमध्ये रुग्ण आढळले असून निरबाडे, मांडवखेरी ही दोन गावे आजही निरंक आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यातील रामपूर, अडरे, कापरे, दादर, खरवते, वहाळ, सावर्डे, फुरुस, शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील ४८ गावांनी गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखले होते. यामध्ये रामपूर हद्दीतील १०, वहाळ हद्दीतील ११ तर खरवते हद्दीतील ७ गावांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, आता दुसऱ्या लाटेत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील उभळे, ओमळी, कळमुंडी, केतकी, खांडोत्री, खोपड, गांग्रई (गावठाण), गांग्रई (सुर्वे), चिवेली, डुगवे, तळवडे, ताम्हणमळा, दादर, नांदगाव खुर्द, निरबाडे, पाथर्डी, बिवली, बोरगाव, मांडवखरी, मालदोली, मालदोली मोहल्ला, रावळगाव, वडेरु या २३ गावांमध्ये एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
खाडीपट्ट्यात होतेय परिवर्तन
रामपूर व कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले बहुतांशी गाव खाडीपट्ट्यात येतात. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २६ गावे असून त्यातील २१ गावांमध्ये रुग्ण आढळले. परंतु डुगवे, कळमुंडी, बोरगाव, चिवेली, उभळे आदी ५ गावांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. त्याचपद्धतीने कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुरुवातीला मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. मात्र, आता त्यावर नियंत्रण ठेवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. अजूनही मालदोली, मालदोली मोहल्ला, गांग्रई (गावठाण), गांग्रई (सुर्वे), खोपड, केतकी या गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.
.................
बिवली व कालुस्ते गावात सुरुवातीपासूनच जनजागृती केली जात आहे. ग्राम कृतीदलाने वाडीनिहाय काम केले. कोणी पाहुणा गावात आला तरी त्याची चौकशी करून होम क्वारंटाईन केले जात आहे. शिवाय बिवलीचे सरपंच अनंत शिंदे व कालुस्तेचे रामकृष्ण कदम यांनी व सदस्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यासाठी गावातील खासगी डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. तसेच ग्रामस्थांना सतत खबरदारीबाबत आवाहनही केले जात आहे.
पराग बांद्रे, बिवली, ग्रामसेवक
..........
चिवेली ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना सातत्यपूर्ण केल्या जात आहेत. आठवड्यातून एकदा गावात गाडी फिरवून स्पीकरद्वारे आवाहन केले जात आहे. तसेच वाडी-वस्तीवर आशा सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरूच ठेवण्यात आले आहे. चाकरमानी लोकांनीही सुरुवातीपासून गावाला सहकार्य केले आहे. नुकताच शिमगोत्सव व शिंपण्याचा कार्यक्रम मोजक्या लोकांमध्ये पार पडला. त्यासाठीही चाकरमान्यांनी गावाकडे न येता मोलाचे सहकार्य केले.
योगेश शिर्के, सरपंच, चिवेली.
..................
सुरुवातीपासून गावात बारकाईने लक्ष दिले जात आहे. गावात नव्याने कोण येत आहे, कोण आजारी पडला आहे, याची माहिती वेळोवेळी घेतली जात आहे. अगदी सर्दी-खोकला झाला तरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. त्यासाठी आशा सेविका मोठी मेहनत घेत आहेत. लसीकरणासाठीही आठ वाड्यांचे नियोजन केले आहे. दर सोमवार, बुधवार व शुक्रवारी ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केले जाते. शिवाय गावपातळीवर मास्कचा वापरही काटेकोरपणे केले जाते.
सुनील हळदणकर, सरपंच, बोरगाव.