देवरूख : संगमेश्वर तालुक्यात मंगळवारी ५८ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील बाधित रूग्णांची संख्या १ हजार ८८५ इतकी झाली आहे.
संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा जणू स्फोट झाला आहे. दिवसागणिक बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. एकाच गावातून ५०हून अधिक बाधित रूग्ण सापडत आहेत. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या तसेच कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे आरोग्य विभागाकडून स्वॅब नमुने घेण्यात येतात. मंगळवारी ५८ नवे रूग्ण सापडले आहेत.
हे रूग्ण देवरूख ग्रामीण रूग्णालय, संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय, वांद्री, माखजन, धामापूर, बुरंबी, निवे, साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. नव्याने रूग्णांची भर पडल्याने कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ हजार ८८५च्या घरात पोहोचली आहे. सध्या ५१० अॅक्टिव्ह रूग्ण असून, ७६ जणांवर रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यात ३३४ रूग्ण गृह अलगीकरणात असून, आजपर्यंत ५८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.