लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील नाणीज गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दक्षतेसाठी ग्रामकृती दलाचे अध्यक्ष गौरव संसारे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. गावाच्या सीमेवर येण्या-जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. एका वाडीतून दुसऱ्या वाडीत कारणाशिवाय जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला असून, त्यासाठी ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभत आहे.
गावामध्ये कामाशिवाय फिरताना कोणीही आढळल्यास त्याची अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवार, दिनांक ३० एप्रिलपासून गावातील सर्व दुकाने दिनांक ६ मेपर्यंत पूर्णवेळ बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. दिनांक ५ मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या बघून ग्रामकृती दल दिनांक ६ मे रोजी दुकाने सुरू करण्यासंदर्भातला नवीन निर्णय जाहीर करणार आहे.
बंद कालावधीमध्ये कोणतीही दुकाने उघडी आढळल्यास त्यांना पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या कालावधीत दूध, भाजी, मासे, मटण, चिकन व हार्डवेअर विक्रेते यांचीही दुकाने बंद राहणार आहेत. त्यांनीही दुकाने उघडी ठेवल्यास त्यांनाही पाच हजारांचा दंड आकारला जाणार आहे. औषधांच्या दुकानांसाठीही वेळेचे निर्बंध जारी केले आहेत. औषधांची दुकाने सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. शिवाय औषधांव्यतिरिक्त अन्य वस्तूंची विक्री केल्यास दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी मात्र डॉक्टर रुग्णसेवा देणार आहेत. अत्यावश्यक सुविधा म्हणून दवाखाने सुरू राहणार आहेत. गावातील बँक, सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. ग्रामकृती दलाने गावातील कोरोना हद्दपार करण्यासाठी निर्बंध जारी केले असून, ग्रामस्थांकडूनही त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.
कोट
कोरोनाबाधित रुग्णांचा गावात मृत्यू झाल्यानंतर प्रत्येकामध्ये धास्ती निर्माण झाली. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. दंड आकारणे व अँटिजेन चाचणीच्या निर्णयामुळे चांगलाचा फायदा झाला. गावातील मंडळी घरात थांबू लागली आहेत. गरजू लोकांना त्यांना पाहिजे ते साहित्य ग्रामकृती दलामार्फत घरपोच करण्यात येत आहे. गावातील प्रमुख चार नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- गौरव संसारे, सरपंच, नाणीज ग्रामपंचायत