अखेर ३१ मार्च रोजी विहिरीच्या कामाला सुरुवात झाली आणि एक तारखेच्या संध्याकाळी यांच्या घशात खवखव सुरू झाली. रात्री खोकला सुरू झाला तो वाढतच गेला. दुसऱ्या दिवशी खोकून खोकून यांच्या छातीत दुखायला लागलं. असा खोकला कधीच झाला नव्हता, असं एकीकडे सांगत होते आणि दुसरीकडे कोरोना म्हणजे फक्त वेगळा सर्दी, खोकला असं म्हणून लक्ष देत नव्हते. तरी एका डॉक्टरांची औषधे घेऊन आले. दोन दिवसांनी खोकला कमी झाला, थोडी सर्दी आली. तिथपासून अंगदुखी, ताप सुरू झाला, अशक्तपणा आला, धाप लागत होती, तरी यांचा हेका कायम: हे पाच सहा दिवसात कमी होणार. पण अगदीच अशक्तपणा उतरेना तेव्हा हे दुसऱ्या डॉक्टरकडे जायला तयार झाले.
इतक्या दिवसात विहिरीचे काम सुरूच होते. कामावर लक्ष ठेवायला हवं होतं. यांच्या दुखण्यामुळे माझ्यावर जबाबदारी येऊन पडली. त्यातूनही हे कॉलेज सांभाळून शेतावर जात होते. पण, अशक्तपणामुळे फार दगदग, प्रवास करू शकत नव्हते. विहिरीला पाणी लागले होते. सगळे खूश होतो. कामावरच्या माणसांसाठी जेवणाचा बेत पार पाडला. पण, यांचा अशक्तपणा कमी होत नव्हता म्हणून दुसऱ्याच दिवशी दहा तारखेला शेजारच्या काकांना विनंती केली की, यांना डॉक्टरकडे घेऊन जा. मी पहाटेच घरातली कामं आवरून शेतावर निघून गेले. मनाशी काही ठरवूनच गेले होते.
डॉक्टरांकडे गेल्यावर काय होईल, काय सांगतील, याची धाकधूक चालू होती. यांचा कॉल आला की, डॉक्टरांनी रक्त तपासणी, एक्सरे करून बघितला. औषधे दिली. घाबरण्यासारखे काही नसले तरी कोरोनाची टेस्ट करून घ्यायला सांगितली होती. मी सैरभैर झाले, कामावरच्या माणसांच्या मागे लागून काम आवरते घ्यायला लावले. संध्याकाळपर्यंत काय काय करायचं ते सांगून मी तीन वाजता निघाले. तोपर्यंत सोसायटीतल्या शेजाऱ्यांनी आमच्या मजल्यावर एक फ्लॅट रिकामा होता. त्याची साफसफाई करून यांच्या विलगिकरणाची तयारी केली होती. दुपारी यांना टेस्ट करायला कोविड सेंटरवर यायला सांगितलं होतं. मी घरी पोचले तर हे अजून आले नव्हते. तशीच सेंटरवर गेले आणि यांना घेऊन आले. हे त्या फ्लॅटमध्ये गेले आणि मी घरात येऊन हात पाय धुवून लादीवरच आडवी झाले. डोकं सुन्न झालं होतं, काही सुचत नव्हतं. तशात मी सकाळपासून फक्त एका चहावर होते. पाचच मिनिटात एकदम दचकून जाग आली.
हे वेगळे राहणार आणि मी मुलांसह आमच्या फ्लॅटमध्ये वेगळी राहणार, कुणीच बाहेर पडणार नाही. फक्त मी यांना जेवण, पाणी द्यायचं असं ठरलं. काहीच पटत नव्हतं. पण, पर्याय नव्हता. टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत असं राहाणं भाग होतं. पाचव्या दिवशी चौदा तारखेला यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सोसायटीतील सगळी पुरुष मंडळी एकदम घरी आली तेव्हा मला अंदाज आला. खरं तर रडूच कोसळलं. पण, माझी शेजारी मैत्रीण आणि इतर सर्वांनी मला शांत केलं आणि अजून दहा दिवस असेच काढायला लागतील हे मी मान्य केलं. तसं बघायला गेलं तर डॉक्टरांच्या औषधांनी यांना खूप फरक पडला होता. ताप, अशक्तपणा पूर्ण गेला होता. थोडा कोरडा खोकला मध्येच येत होता. पण, फार त्रास नव्हता. तोपर्यंत कोरोनाच्या उद्रेकाच्या बातम्या सगळीकडून येऊन मनात भीतीचे काहूर माजवत होत्या. यांची जरा चिडचिड झाली. पण, वाचनाची आवड असल्याने त्यांना फार एकटं वाटत नव्हतं. दोन दिवसांनी तर यांनी कॉम्प्युटर मागवून घेऊन ऑनलाईन क्लास घ्यायला सुरुवात केली.
इकडे आमची अवस्था बिकट होती. शेजारी सर्वतोपरी मदत करत होते. लागेल तो जिन्नस, औषधे आणून द्यायचे. पण, बाहेर लांब ठेवलेल्या वस्तू पाहून मला भरून यायचं. मुलांना समजावत होते. मुलगा मोठा आणि समजूतदार असल्याने त्याचा तसा त्रास नव्हता. पण मुलगी चिडचिड करायची. बाहेर मुलांचा आवाज आला की, तिची किरकिर सुरू व्हायची. अचानक बाहेर पडणे बंद झाल्यावर मुलांना जास्त त्रास होत होता. यांना पौष्टिक जेवण, चहा, सूप, गरम पाणी वगैरे देणं सुरू होतं. माझ्या घशाखाली मात्र घास उतरत नसायचा. माझी बहीण आणि शेजारची मैत्रीण रोज कॉल करून धीर द्यायच्या. दीर, जाऊबाई, इतर नातेवाईक चौकशी करत होते, निरनिराळ्या गोष्टी सुचवत होते. सगळ्यांचा आधार वाटत होता. फोन माणसांना जवळ ठेवण्यात मदत करत होता. एक दिवशी तर विहिरीचे काम घेतलेले ठेकेदार यांच्यासाठी खास जेवण घेऊन आले.
आता वेळ होती आमची टेस्ट करण्याची. आम्हाला काहीच लक्षणे नव्हती. मुलांना घेऊन त्या कोविड सेंटरवर जायचं माझ्या जीवावर आलं होतं. पण मुलांनीच मला धीर दिला. त्यांना आपण निगेटिव्ह असल्याची खात्री होती. त्यामुळे पटकन टेस्ट करून रिपोर्ट आला की, ती बाहेर जायला मोकळी! पण चार, पाच, सहा दिवस झाले तरी आमचे रिपोर्ट काही येतच नव्हते. कुणाकुणाकडे चौकशी केली. काहीच कळेना. कसे बसे दिवस सरत आले. तेवीस तारखेला आरोग्य विभागाने निरोप दिला की, तुमचे विलगीकरण संपले आहे.
मग चोवीस तारखेला हे घरी आले. सोसायटीतील सगळे योग्य ती काळजी घेऊन जमले होते. मी ओवाळून यांना घरात घेतले. एक अरिष्ट संपल्यासारखे वाटत होते आणि त्याच दुपारी आमचे तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा मेसेज आला. दुधात साखर. त्यादिवशी मला जेवण गोड लागले.
आज सर्वत्र कोरोनाची दहशत आहे. मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांकडून संसर्ग झाल्याची, विलगिकरणात असल्याची, दवाखान्यात दाखल झाल्याची आणि कधी दुर्दैवाने कुणी गेल्याची अशाच बातम्या येत आहेत. अनेक कुटुंबे यात होरपळून जात आहेत. आम्हाला त्याची थोडीशी धग लागली. पण, अनेक गोष्टी शिकवून गेली. अगदी जवळचे लोकसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह म्हटलं की, वेगळ्याच नजरेने बघतात. अर्थात प्रत्येकाने आपली काळजी घेण्याचा हा काळ आहे. पण, त्याचवेळी काही खास जवळची माणसे दूर असली तरी सोबत देतात.
ज्यांच्या फ्लॅटमध्ये हे राहिले त्यांच्याकडूनसुद्धा शिकायला मिळालं. कोरोनाचा पेशंट ठेवायचा म्हणजे लोक घाबरतात. ते लोक एवढ्यात इकडे यायची शक्यता नसली तरीही त्यांनी काही आढेवेढे घेतले नाहीत हे त्यांचे मोठेपण. मला गेल्या वर्षीची आठवण झाली. गावात येणाऱ्या लोकांना विलगीकरण करण्यासाठी रिकामी घरं शोधत होते. आमचं घर होतं रिकामं. पण द्यायला आमची तयारी होत नव्हती. आज वाटतं की, भविष्यात अशी वेळ आली तर मागेपुढे न बघता घर उघडून घ्या म्हणायचं. आज गरीब श्रीमंत न बघता कोरोना सगळ्यांना ठोकून काढतोय. अशा वेळी कुठे माणुसकी हरवल्याच्या तर कुठे उजळून आल्याच्या घटना घडत आहेत. खरं तर यावेळी माणसांना ऑक्सिजनपेक्षा प्रेम आणि आधाराची जास्त गरज आहे.
- नीता पाटील, दापोली