विविध कामे मार्गी
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील चाफवली ग्रामपंचायतीतर्फे १५व्या वित्त आयोगातून करंजेवाडी गणपतीविसर्जन तळी खोदणे व बांधणे, यासाठी ८० हजार रुपये मंजूर झाले आहेत. भोयरेवाडी फाशीचे पाणी ते बोडेकर घर पाखाडी बांधण्यासाठी १५व्या वित्त आयोगातून ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत.
आरोग्य सर्वेक्षण उपक्रम
दापोली : दापोली नगरपंचायत व मरीआई मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘माझी रत्नागिरी आणि माझी जबाबदारी’ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. घरोघरी जाऊन ऑक्सिजन पातळी व तापमान तपासणी करून आरोग्याची माहिती घेण्यात येत आहे.
निर्जंतुकीकीरण
गुहागर : येथील जिमखानातर्फे परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले. गुहागर शहर, आरेगाव, भंडारवाडा व असगोली येथील मुख्य परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले. चारशे लीटर हायपोक्लोराइडची फवारणी करण्यात आली. या उपक्रमात जिमखानाचे सर्व सदस्य सहभागी झाले होते.
विजेचा खेळखंडोबा
देवरूख : शहरातील कांजविरा परिसरात विजेचा गेली १५ दिवस खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत वीज कार्यालयाशी संपर्क साधला असता, उडवाउडवीचीच उत्तरे दिली जात आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास, येथील ग्राहकांनी दि.१० रोजी कार्यलयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.