रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होऊ लागली असून, आरोग्य विभागाला दिलासा मिळू लागला आहे. सध्या रुग्णांची संख्या १५० च्या आत आहे. मृत्यूची संख्या मात्र अजूनही चिंताजनक आहे. रुग्णांनी उपचारासाठी वेळेवर दाखल झाल्यास मृत्यू कमी होतील, असे मत व्यक्त होत आहे.
पावसाचा इशारा
रत्नागिरी : महापुरानंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार १५ ते १९ ऑगस्ट या काळात पुन्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सातवा वेतन आयोग लागू
दापोली : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक वर्गाला सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. अनेक वर्षे रखडलेला निर्णय अखेर मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विद्यापीठातील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनही केले होते.
बाकाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
राजापूर : एनसीसी परीक्षेच्या मेरीट लिस्टमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद बाकाळे शाळेने धवल यश संपादन केले आहे. या शाळेतील पहिलीतील मानस गाडगीळ हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे, तर नील परांजपे याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मालमत्ता नावे नसल्याने अडथळे
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७३८ एकूण मालमत्ता आहेत. त्यापैकी ३३२ मालमत्ता अजूनही जिल्हा परिषदेच्या नावे झालेल्या नाहीत. २२४ मालमत्तांचे प्रस्ताव महसूल यंत्रणेकडे अद्यापही सादरच करण्यात आलेले नाहीत. जिल्ह्यात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी मालमत्ता नावे होणे गरजेचे आहे.