चिपळूण : तालुक्यातील पिंपळी गजमल येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाने हिरावले आहे. डांबर सप्लायर्स व सरकारी ठेकेदार मारुती चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेत मारुती चव्हाण यांचे निधन झाले असून, त्यांचे आई-वडील आणि मुलगा यांनाही कोरोनाने हिरावून नेले आहे.
मूळचे कर्नाटक येथील बाळू चव्हाण आपल्या कुटुंबीयांसमवेत उदरनिर्वाहानिमित्त कोकणात खेड येथे आले. या ठिकाणी छोटी छोटी कामे करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत असताना मुलगा मारुती याला सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण दिले. यानंतर मारुती यांनी मागे वळून न पाहता आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. शासकीय कामे करत करत त्यांनी या व्यवसायात जम बसवला. यानंतर ते चिपळुणात पिंपळी येथे आले. तेथे त्यांनी स्वतःचे हक्काचे घर बांधले. चिपळुणात शासकीय कामे करीत असताना डांबर पुरवठ्याचाही व्यवसाय सुरू केला. या दोन्ही व्यवसायात मारुती चव्हाण यांनी उत्तमपणे जम बसवला.
या हसत्या खेळत्या कुटुंबात काही दिवसांपूर्वी कोरोनाने प्रवेश केला. प्रथम मारुती चव्हाण यांचे वडील बाळू यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची आई, नंतर स्वतः मारुती चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली. या तिघांवर काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, या तिघांच्या प्रकृतीत तितकीशी सुधारणा झाली नाही. यामुळे टप्प्या-टप्प्याने तिघांचे निधन झाले. दरम्यान, मारुती चव्हाण यांचा मुलगा पद्मन हाही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. पद्मनवर मुंबई-ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, पद्मन याची शेवटपर्यंत प्रकृती सुधारली नाही. १ जून रोजी त्याचीही प्राणज्योत मालवली. यामुळे चव्हाण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.