लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे मृत एस. टी. कर्मचाऱ्यांंच्या वारसांना ५० लाखांचे विमा कवच जाहीर करण्यात आले असले तरी एकूण २६१ मृतांपैकी १० ते १२ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना रक्कम प्राप्त झाली आहे. तरी महामंडळाने जाहीर केल्याप्रमाणे कोरोनाने सर्व मृत एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा कवचाची ५० लाख रुपये रक्कम देण्यात यावी.
याबाबतचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांना दिले आहे. त्याद्वारे एस. टी. कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी दि. १ जून २०१८ रोजी वेतनवाढीपोटी एकतर्फी ४८४९ कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, त्याचे वाटप संघटनेने दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे केलेले नाही, असे म्हटले आहे.
कामगार करारातील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रा. प. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे मान्य केले आहे. मात्र, जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीची ३ महिन्यांची २ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी व जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची ९ महिन्यांची ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून ५ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने अदा केलेला आहे.
महामंडळाच्या प्रचलित धोरणानुसार सेवेत असताना कर्मचारी मृत झाल्यास त्याच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाते. मात्र, सद्य:स्थितीत ती थांबविण्यात आली असून, ती त्वरित सुरू करून नोकरी देण्यात यावी. कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती अद्याप झालेली नाही. ती त्वरित करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.