लोकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गालगत असणाऱ्या दख्खन गावात दोन दिवसांत तब्बल ५५ पॉझिटिव्ह आढळले आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह साखरपा परिसर हादरून गेला आहे.
साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टीमने दख्खनमध्ये जाऊन तपासणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली. ही चाचणी केल्यानंतर रविवारी ९ तर सोमवारी ४६ पॉझिटिव्ह आढळले. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळण्याच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने चिंता वाढली आहे.
जनतेने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट होऊन आरोग्य यंत्रणेला व कोरोनाशी लढणाऱ्या सर्वच यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनतेने अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नका, असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढताच साखरपा तपासणी नाक्यावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.