गुहागर : तालुक्यातील पालशेत गावात कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडू लागले आहेत. या गावात तब्बल १९२ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्याची आरोग्य यंत्रणा धास्तावली आहे. या गावात रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी सध्या ६९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विशेष गाड्यांचे आरक्षण
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे यांच्या समन्वयाने १६ नवीन विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यामुळे गणेशभक्तांची सोय होणार आहे. यापैकी काही गाड्यांचे आरक्षण नुकतेच सुरू झाले आहे. आरक्षण सुरू होताच या गाड्या पूर्णत: आरक्षित होऊ लागल्या आहेत.
जनजीवन पूर्वपदावर
साखरपा : गेल्या आठवड्यापासून पावसाच्या विश्रांतीनंतर आता उन्हाचा अनुभव मिळू लागला आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात असलेली पूरपरिस्थिती आता हळूहळू निवळू लागली आहे. साखरपा परिसरालाही या अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला होता. अनेक जणांची शेती पाण्याखाली गेली होती. परंतु आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
बँकेचे विलीनीकरण
रत्नागिरी : देना बँकेचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदा या बँकेत करण्यात आले आहे. देना बँकेत ज्या निवृत्तीधारकांचे वेतन जमा होत होते ते आता बडोदा बँकेत जमा होणार आहे. यासाठी नवीन खाते क्रमांकाच्या पासबुकची झेरॉक्स प्रत बँक बदलण्यासाठीच्या अर्जासोबत कोषागार कार्यालयात १५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याच्या सूचना जिल्हा कोषागार कार्यालयाने केल्या आहेत.
गरजूंना साहाय्य
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील स्व. ना. दे. जायगडे गुरुजी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे गरजूंना साहाय्य करण्यात आले. ही संस्था २००८ सालापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. कोरोनाकाळात बाधित झालेल्या शांताराम वड्ये, सुरेश करंडे यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.