रत्नागिरी : गाव, वाड्यांमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. म्हणून तपासण्या करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे पथक गाव तसेच वाड्यांमध्ये तपासणीसाठी जाणार आहे. कोणत्याही ग्रामस्थाला तपासणीसाठी रत्नागिरीत यावे लागणार नाही. जेणेकरून रत्नागिरीतील कोरोना तपासणी केंद्रावर गर्दी होणार नाही आणि कोरोना प्रादुर्भाव राेखला जाईल, अशी माहिती उपाध्यक्ष उदय बने यांनी दिली.
कोरोना रुग्ण वाढत असून ग्रामीण भागात सुविधा उपलब्ध नाहीत, याचा आढावा घेण्यासाठी उपाध्यक्ष बने यांनी जिल्हा दौरा आयाेजित केला होता. यामध्ये काही प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयांना भेटी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावे उपाध्यक्ष बनेही उपस्थित होते. त्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी गावपातळीवर तपासण्यांचा फंडा राबविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक गावांतील ग्रामस्थांना कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर तपासणीसाठी कोठे जायचे हा प्रश्न निर्माण होतो. रत्नागिरी किंवा अन्य ठिकाणच्या तपासणी केंद्रावर यायचे झाले तर वाहतुकीच्या साधनांच्या साधनांचा अभाव आहे.
एकाच वेळी गावातील किंवा वाडीतील लोक तपासणीसाठी गर्दी करतात. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही गर्दी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. एखाद्या गावात, वाडीत ग्रामस्थांना कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाचे एक पथक त्या गावात पोहोचेल. त्या रुग्णांची तपासणी करून पुढील उपचार किंवा निर्णय घेतला जाईल, असेही बने यांनी सांगितले.
...............................
उदय बने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीदरम्यान अधिकारी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.