लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या वर्षी वर्षभर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे एप्रिलपासून अनेकांच्या विवाहाचे मुहूर्त हुकले. मात्र, लाॅकडाऊन शिथिल होताच अनेकांनी नोंदणी कार्यालयाचा आधार घेत विवाह उरकून घेतले. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या वर्षात ४१ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. डिसेंबरमध्ये लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यानंतर या एका महिन्यात नोंदणी पद्धतीने तब्बल १६ जणांच्या विवाहाचे बार उडाले.
गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच २३ मार्चपासून देशभरातच कडक लाॅकडाऊन सुरू झाले. हे लाॅकडाऊन पुढे सुरूच राहिले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून ज्यांच्या लग्नाचे मुहूर्त ठरले होते, ते रद्द करावे लागले. अनेकांनी लाॅकडाऊन संपल्यानंतर लग्न करू, असा विचार करत प्रतीक्षा सुरू ठेवली. मात्र, लाॅकडाऊनचा कालावधी वाढत गेला. त्यामुळे मुहूर्तही लांबत गेले. काहींनी या वर्षभरात लग्नाचा विचारच केला नाही.
लाॅकडाऊनच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच लग्न तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विवाह झालेच नाहीत. या कालावधीत सर्वच कार्यालयांची कामे थांबली होती. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाहालाही परवानगी नव्हती. मात्र, जून महिन्यात काही अंशी लग्न तसेच अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांना मर्यादित जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली. त्यामुळे काहींनी नोंदणी पद्धतीने विवाह उरकून घेतले. तर काहींनी एवढ्या कमी संख्येत लग्न कसे करायचे, असे म्हणत लग्नाचा मुहूर्तच पुढे ढकलला. मात्र, मुहूर्त गेल्याने नोंदणी पद्धतीकडे विवाहेच्छुक वळल्याने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ४१ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. यापैकी १६ विवाह डिसेंबर या एका महिन्यात झाले.
त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय, असे वाटू लागल्याने मंगल कार्यालयात विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात विवाह नाेंदणी करणाऱ्यांचे प्रमाण कमी आले तरीही या तीन महिन्यात नोंदणी पद्धतीने ११ विवाह झाले.
चौकट
प्रत्येक महिन्याला ४ ते ५ विवाह नोंदणी पद्धतीने होतात. वर्षाला सुमारे ५० विवाह होतात. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात नोंदणी विवाहालाही परवानगी नव्हती. त्यामुळे या महिन्यात विवाह झाले नाहीत. मात्र, जून महिन्यापासून विवाहांना प्रारंभ झाला. डिसेंबर महिन्यात लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यानंतर एकाच महिन्यात १६ विवाह झाले. ४१ विवाहांपैकी दोन विवाह नोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मंगल कार्यालयात जाऊन लावले.
२०२० साली असे झाले विवाह
कोट
२०२० हे वर्ष पूर्णपणे कोरोना वर्ष ठरले. त्यामुळे ज्यांची लग्नं ठरली होती, त्यांनी मुहुर्ताची वाट न बघता नोंदणी पद्धतीने विवाहाला प्राधान्य दिले.
- महेश जुवळे, विवाह नोंदणी अधिकारी, रत्नागिरी
महिना विवाह
जानेवारी ४
फेब्रुवारी ५
मार्च १
एप्रिल ०
मे ०
जून २
जुलै ४
ऑगस्ट ३
सप्टेंबर ०
ऑक्टोबर २
नोव्हेंबर १
डिसेंबर १६
जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत झालेले विवाह : ११
जानेवारी : ६
फेब्रुवारी ४
मार्च : १