लांजा
: कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी लांजा पोलीस, नगरपंचायत आणि आरोग्य विभाग यांनी ‘ऑन द स्पॉट’ अँटिजन चाचणी करण्याचा धडका लावला आहे. शुक्रवारी दिवसभरात ३५ जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यात एक कोरोना रुग्ण सापडला आहे.
दुसऱ्या टप्प्यात संसर्गाची तीव्रता अधिक असल्याचे वारंवार सांगितले जात असतानाही विनाकारण रसत्यावर फिरण्याची लोकांची हौस कमी होत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून अशा लोकांची जागेवरच अँटिजन केली जात आहे. शुक्रवारी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे यांनी शहरामध्ये सकाळी स्वतः जाऊन पाहणी केली. यावेळी ४२ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली.
कुवे मावळतवाडी येथील एक इसमाला डोकेदुखी व तापाची कणकण येत असल्याने स्वतःहून येऊन आपली चाचणी करून घेतली, त्यात तो कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.