रत्नागिरी : राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णांची हळूहळू वाढ होत आहे. गेले दोन दिवस सलग चार रुग्ण आढळत असतानाच रविवारी जिल्ह्यात ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे सक्रिय रुग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असतानाच कोरोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, लवकरच मास्क तोंडावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात १२३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये चिपळुणात एका रुग्णाचा, तर राजापूर तालुक्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णसंख्या ८४,५०५ झाली आहे.
आतापर्यंत एकूण ८१,९५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांमध्ये चिपळूण तालुक्यातील ४ रुग्ण, रत्नागिरीतील ६ रुग्ण, राजापूरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. एकूण २,५३४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.