लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, गेल्या सव्वा वर्षात रुग्णांची संख्या पाच हजारपेक्षा जास्त झाली आहे. यामध्ये ० ते १८ वयोगटातील मुलांची संख्या ५०७ असून, पैकी ४६१ मुलांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात उपचार सुरू असलेल्या ४६ लहान मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे.
तालुक्यात गत सव्वा वर्षात प्राप्त आकडेवारीनुसार, नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन वेळीच उपचार घेतल्यास नक्कीच कोरोनाला कोणतेही औषध नसले तरी सर्वच ० ते १८ असो किंवा ६० वर्षावरील कोणत्याही वयोगटात रोखता येऊ शकते, हे सिद्ध होत आहे. मार्चपासून सुरू झालेली दुसरी लाट नियंत्रणात आणताना लसीकरण, रुग्णांचा शोध घेणे व लागण पसरणार नाही, याची खबरदारी घेणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेली लस सध्यातरी १८ वर्षांपक्षा कमी वयाच्या मुलांना देता येत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या दोन वर्षात लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात एप्रिल २०२०पासून ० ते १८ वयोगटातील ५०७ मुले कोरोनाबाधित झाली तर त्यापैकी ४६१ मुले पूर्णपणे बरी झाली आहेत. सध्या तालुक्यात एकूण ३११ ॲक्टिव्ह रुग्ण असून, ४६ जण ० ते १८ वयोगटातील तर १४ वर्षांखालील २४ मुले कोरोनाबाधित आहेत. या सर्व मुलांची प्रकृती चांगली असून, ते लवकरच बरे होतील, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तालुक्यात गेल्या चोवीस तासात १४ वर्षांखालील ८ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुका आरोग्य विभाग ० ते १८ वयोगटातील कोरोनाबधितांची विशेष काळजी घेत असून, शासकीय कोविड सेंटर्स, सीएचसी सेंटर्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घरातील व्यक्ती कोरोनाबाधित आल्याने या मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, जूनमध्ये तब्बल १,००९ जणांना कोरोनाची लागण झाली तर तब्बल २८ जणांचा कोरोनाने बळी घेतला. तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९७ इतकी झाली आहे. आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या ५,१०१वर पोहोचली आहे. एप्रिल व मे महिन्यात एक हजाराचा टप्पा ओलांडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येने जून महिन्यातही हा टप्पा पार केला. या महिन्यात १,००९ रूग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यात ३१३ रूग्ण सक्रिय असून, आतापर्यंत ४,६४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शिवतेज कोविड सेंटरमध्ये ४८, कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ४२, नगर परिषद सीसीसीत २०, डीसीएससी व शिवतेज येथे २७ रूग्ण उपचार घेत आहेत.