चिपळूण : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरात कोरोना विषाणूविषयी बॅण्डद्वारे जनजागृती केली जात आहे. पोलीस यंत्रणेच्या या उपक्रमाला नागरिकांकडून प्रत्येक ठिकाणी टाळ्यांच्या गजरात दाद दिली जात आहे.अपुरी कर्मचारी संख्या व २४ तास सेवा बजावणाऱ्या पोलीस यंत्रणेने आता सामाजिक बांधिलकीतून नागरिकांना कोरोनाविषयी जागृत करण्यासाठी चक्क आपल्या बॅण्डचा वापर सुरु केला आहे. दाट वस्ती व रहदारीच्या ठिकाणी बॅण्डद्वारे देशभक्तीपर गीत सादर करून त्या-त्या भागातील नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली जात आहे. त्याचवेळी लॉकडाऊनचे महत्त्व, संचारबंदीचे नियम व कोरोनाविषयीची भीषणता नागरिकांना सांगितली जात आहे.शहरातील काविळतळी येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागात हा कार्यक्रम केला जाणार आहे. यावेळी उपस्थित असणारे पोलीस दल व नागरिक हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना त्यातून एक संदेश देत आहेत.
या पोलीस बॅण्ड पथकाचे शहरातील विठलाईनगर येथील नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच भारत माता की जय, वंदे मातरम्च्या घोषणांनी स्वागत केले. बॅण्डच्या आवाजाने घरामध्ये असणाऱ्या नागरिकांना एक उत्स्फूर्त प्रेरणा, आशेचा किरण मिळत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली. यावेळी काही नागरिक इमारतीच्या गॅलरीत व पार्किंग झोनमध्ये उभे राहून पोलीस बॅण्डला दाद देत होते.