रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊनचे संकट जगभरातील देशांवर आहे. लॉकडाऊनमुळे शेतमालासह विविध व्यवसायांना बसला असताना, पणन विभाग व कृषी विभागाच्या प्रयत्नाने हापूस निर्यातीला चालना मिळाली आहे. जलवाहतुकीव्दारे १०५ टन हापूस गेल्या आठवड्यात आखाती प्रदेशात निर्यात करण्यात आला. त्यानंतर बुधवार दिनांक ८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील वाशी मार्केट येथून २८२ मेट्रिक टन हापूस संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत याठिकाणी निर्यात करण्यात आला आहे.यावर्षी हापूस हंगाम नियोजित हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला आहे. मात्र, आंबा हंगाम सुरू होत असतानाच कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. उष्म्यामुळे आंबा तयार होऊ लागला आहे. बहुतांश शेतकरी वाशी, नवी मुंबई येथील मार्केटमध्येच आंबा विक्रीसाठी पाठवितात. मात्र, कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आंबा खरेदीसाठी ग्राहक नसल्याचे मुंबईतील व्यापारी सांगत आहेत.
शिवाय ग्राहकांअभावी दरही गडगडले आहेत. त्यावर पर्याय म्हणून पणन मंडळ, कृषी विभाग, आत्मा यासह काही खासगी व्यापाऱ्यांनी हापूसच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरू केले. अन्य जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी चर्चा करून शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात ४४० पेट्या सातारा जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.मुंबई मार्केटवर भिस्त ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. यावर पर्याय म्हणून आखाती प्रदेशातील निर्यात जलवाहतुकीव्दारे सुरू करण्यात आली आहे. आखाती देशातून आंब्याला मागणी आहे. मात्र, हवाई वाहतूक बंद असल्याने समुद्रमार्गे वाहतूक करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे.
गेल्या आठवड्यात १०५ मेट्रिक टन आंबा आखाती प्रदेशात पाठविण्यात आला. बुधवारी पुन्हा २०५ मेट्रिक टन आंब्याची निर्यात वाशी मार्केटमधून बहरीन, कुवेत व संयुक्त अरब अमिरातकडे करण्यात आली आहे. निर्यात वाढली तर वाशी मार्केटमधील साठणाऱ्या आंबा पेट्यांची साठवणूक कमी होऊन दर स्थिर राहणार आहेत. सध्या ग्राहकांअभावी पेटीला पाचशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत दर देण्यात येत आहे. निर्यात वाढली तर दरही वाढण्याची शक्यता आहे. जलवाहतुकीव्दारे निर्यात होणाऱ्या मालासाठी खर्च कमी येत आहे.वाढती मागणीशेतमालाला आखाती प्रदेशातून मागणी वाढत आहे. बुधवारी २८६४ शेतमालाची निर्यात करण्यात आली आहे. त्यामध्ये १५०० मेट्रिक टन कांदा, २८२ मेट्रिक टन आंबा, ६०० मेट्रिक टन भाजीपाला, ४८२ मेट्रिक टन द्राक्ष, ८५५ मेट्रिक टन केळी निर्यात करण्यात आली. कांदा, भाजीपाला, द्राक्ष, केळ्यांसह आंबा निर्यात करण्यात आला आहे. आंब्याची निर्यात वाढण्याची शक्यता आहे.