रत्नागिरी : कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. परिणामी सर्व व्यवसायांना त्याचा फटका बसला आहे. देशात दिनांक १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने लग्नसराईवरही त्याचे सावट पसरले आहे. जिल्ह्यात तब्बल ७० मंगल कार्यालय असून, रत्नागिरी तालुक्यात १५ आहेत. ही सर्व मंगल कार्यालय आता बंदच आहेत.लॉकडाऊनमुळे अनेकांनी लग्न, साखरपुडा यासारखी शुभकार्य सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहेत. वार्षिक परीक्षा दिनांक ९ ते १० एप्रिलपर्यंत संपत असल्याने बहुधा त्यानंतर सुट्टीमध्ये लग्नाचे मुहूर्त काढले जातात. बहुतांश यजमान मंडळींनी लग्नाचा जथ्था काढणे, दागिने खरेदी करणे, लग्नासाठी सभागृह आरक्षित करणे, जेवण, नाश्तासाठी आॅर्डर देणे, मेहंदी, पार्लर याबरोबरच वाजंत्री, मंडप, विद्युत रोषणाई आदीसाठी आगाऊ नोंदणी करावी लागते.मात्र, लॉकडाऊनमुळे आता यातील काहीच शक्य नाही. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊनची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे. परिणामी अनेकांनी लग्न समारंभच रद्द करून दिवाळीनंतरचे मुहूर्त काढण्याचे निश्चित केले आहे. लॉकडाऊनमुळे सभागृह, पत्रिका छपाई, मंडप सजावट, विद्युत रोषणाई, वाजंत्री, कॅटरिंग व्यवसाय, फुले विक्रेते, ब्युटी पार्लर, कापड, सराफी व्यवसाय, फोटाग्राफी, व्हिडीओ शुटिंग हे व्यवसायही संकटात सापडले आहेत.जमावबंदीच्या काळात शासन आदेश झुगारून लग्न लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याने अनेक यजमानांनी याचा धसका घेत विवाह मुहूर्त पुढे ढकलला आहे. देशभरात लॉकडाऊन असल्याने ज्यांनी १५ एप्रिलनंतर लग्नाच्या तारखा निश्चित केल्या होत्या, त्यांना लग्नाची खरेदी करणे अशक्य बनले आहे. काहींनी लग्नपत्रिका छापल्या असल्या तरी आता लग्नाचे मुहूर्तच पुढे ढकलण्याची वेळ त्यांच्यावर आल्याने पत्रिकेवरील वेळ, तारीख यात बदल करावा लागणार आहे.
लॉकडाऊनमुळे जनता सध्या घरात बंद आहे. मंगल कार्यालय चालविणाऱ्या व्यावसायिकांसमोरही त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लग्न, तसेच अन्य समारंभ यावरच आम्हा व्यावसायिकांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. मंगल कार्यालयांवर अवलंबून असणारे कॅटरिंग व्यावसायिक, भटजी, सजावटवाले, वाढपी, आईस्क्रिम हे व्यवसायही अडचणीत आले आहेत. १४ एप्रिलनंतर विवाह मुहूर्त असणाऱ्यांना अद्यापही आशेचा किरण असल्यामुळे त्यांच्याकडून नियोजित तारखा रद्द करण्यात आल्या नसल्या, तरी त्यापूर्वीचे असलेले मुहूर्त मात्र रद्द झाल्याने आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.- राजेंद्र देवरूखकर, व्यावसायिक
लॉगडाऊनमुळे देशातील जनता सध्या घरात बंद आहे. सभागृह चालविणाऱ्या व्यवसायिकांवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उभारले आहे. लग्न, तसेच अन्य समारंभ यावरच सभागृह चालकांचा व्यवसाय चालतो. शिवाय यावर अवलंबून असणारे कॅटरिंग, भटजी, सजावट, वाढपी, शीतपेय व्यवसाय देखील अडचणीत आले आहेत. दि.१४ एप्रिल नंतरचे मुहूर्त असणाऱ्या यजमान मंडळींना अद्यापही आशेचा किरण आहे. सध्यातरी दि.१४ नंतरच्या तारखा रद्द करण्यात आल्या नसल्या तरी यापूर्वीचे मुहूर्त रद्द झाले आहेत.- विकास खांडेकर, व्यावसायिक
मुहूर्त दिवाळीनंतरकोरोनामुळे ठरलेले विवाह सोहळे काही यजमानांनी रद्द केले असले तरी लॉकडाऊन संपल्यानंतर घरगुती पद्धतीने सोहळा आयोजित करून विवाह उरकण्याची तयारी अनेकजण करीत आहेत. घरातील मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत लॉकडाऊननंतर लग्न उरकण्याचा मनसुबा रचला जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन केव्हा संपतेय, याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.