रत्नागिरी : जिल्ह्यातील तिसरा कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. तालुक्यातील साखरतर भागातील ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे येताच प्रशासनाने तातडीने हा परिसर सील केला आहे. या भागातील परिसर सील केला असून, प्रतिबंधित करण्यात आलेल्या परिसराचा नकाशा प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन दक्षता घेत आहे. मात्र, कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. त्यामुळे प्रशासनही हादरून गेले आहे. जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रूग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आढळून आला होता. त्याच्यावर तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले.
या रूग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले होते.
त्यानंतर प्रशासनाने तीन किलोमीटरचा परिसर सील करून ठेवला आहे. या भागातील नागरिकांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे.त्यानंतर मंगळवारी रत्नागिरी शहरानजीकच्या साखरतर परिसरातील एका ५२ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. ही महिला ताप, सर्दी झाल्याने एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. तेथील डॉक्टरने तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. जिल्हा रूग्णालयात तिला दाखल केल्यानंतर तिचे नमुने सांगली येथे पाठविण्यात आले होते.
ते पॉझिटीव्ह आल्याचे सांगण्यात आले. या महिलेची इतर माहिती गोळा करण्यात येत असून, ती आणखी कोणाच्या संपर्कात आली आहे का, हेही तपासले जात आहे.साखरतर येथे कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने साखरतर परिसर सील केला आहे. याठिकाणी पोलीस छावणी उभारण्यात आली असून, पोलिसांनी प्रतिबंधित परिसराचा नकाशा जाहीर केला आहे.
या भागात येणारी जाणारी रहदारी बंद करण्यात आली आहे. साखरतरमधील ३ किलोमीटर क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ३ किलोमीटर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधीत क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार प्रतिबंध करण्यात आले आहे.