रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या साखरतर येथील ५२ वर्षीयमहिलेला महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले.
त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन झाली आहे़ या महिलेच्या प्रवासाची माहिती गोळा करण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. साखरतर भागात कोरोनाचा रूग्ण सापडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा भाग सील केला आहे.कोरोनाचा पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सापडला होता़ त्यानंतर रत्नागिरीतील राजीवडा-शिवखोल मोहल्ला येथील एका भाडेकरुला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते़मंगळवारी जिल्ह्यातील तिसरा रूग्ण सापडल्यामुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे.कोरोनाबाधित महिला सर्दी, ताप झाल्याने एका खासगी रूग्णालयात तपासणीसाठी गेली होती. तेथील डॉक्टरने तिला जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविले होते. दोन दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़
सोमवारी तिच्या थुंकी आणि थ्रोटचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ त्याचा अहवाल मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे यांना प्राप्त झाला असून, ते पॉझिटिव्ह आले आहेत.