कोकणामध्ये मैदानात अथवा सार्वजनिक ठिकाणी आंब्याच्या, शेवरीचे झाड तोडून फागपंचमीच्या आदल्या दिवशी आणले जाते. झावळ्या, पाने, गोवऱ्या, माड आणि पोफळीचे ओंडके एकत्र आणून होळी रचली आणि सजवली जाते. त्यावर फुलांचे तोरण लावण्यात येते. दररोज दहा दिवस सूर्यास्तानंतर होळी पेटविण्यात येते. मात्र, फाल्गुन पौर्णिमेला होम केला जातो. त्याची विधिवत आणि ग्रामस्थ व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो. दररोज दहा दिवस होळीभोवती फेऱ्या मारत बोंबा मारल्या जातात. होळीच्या निमित्ताने वातावरणातील आणि मनातील विनाशकारक विचार, दुर्गुण पेटून त्याचा नाश व्हावा, एवढीच यामागची धारणा आहे. सध्या कोरोनाच्या नावाने बोंबा मारल्या जात आहेत. कोराना होळीमध्ये जळून भस्मसात व्हावा, अवघा जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण राज्य, देश कोरोनामुक्त व्हावे, यासाठी प्रार्थना केली जात आहे.
पालखी घरोघरी
एरव्ही वर्षभर ग्रामदेवतेच्या दर्शनाला भाविकांना मंदिरात जावे लागते. शिमगोत्सवात मात्र फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात कोकणातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी घरोघरी येते. या पालखीमध्ये देवतेचे मुखवटे आणि प्रतिमा ठेवण्यात येतात. पालखी फुलांनी सजविली जाते. देवदेवतांनाही दागिन्यांनी मढवले जाते. विशिष्ट तालामध्ये नाचत आणि नाचवत पालखी गावोगावी फिरत असते. गावातील प्रत्येक वाडीमध्ये, घरासमोर पालखी नाचविली जाते. पालखीचा मुक्काम मात्र सहाणेवर असतो. या ठिकाणी ओटी, पूजा स्विकारली जाते. नोकरी व्यवसायानिमित्त परगावी स्थिरावलेले भाविक ग्रामदेवतेच्या पूजेसाठी आवर्जून उपस्थित राहत आहेत. कोरोनामुळे काही गावांमध्ये घरोघरी पालख्या येणार आहेत. मात्र, पालखी नाचविता येणार नाही. काही गावांमध्ये पूजाही स्वीकारण्यास नकार दर्शविण्यात आला असून, पालखी खांद्याऐवजी रथातूनच नेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणात सध्या सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू झाली असली, तरी कोरोनाचे सावट मात्र सर्वत्र आहे. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही होळी पेटविण्यात येते. शेवरीचे झाड वाजत गाजत आणून फागपंचमीला होळी उभी केली जाते. मुख्य होळीच्या बाजूला छोटी होळी दहा दिवस पेटविण्यात येते. होळी पौर्णिमेला मात्र मोठा होम केला जातो. गुरुवार दि.१८ मार्चपासून जिल्ह्यात होळी सुरू झाली आहे. जिल्ह्यात १,१६७ सार्वजनिक तर ३,०७९ खासगी होळ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. शिमगोत्सवाची सर्वत्र धूम सुरू झाली असली, तरी पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. त्यामुळे कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालख्या रूपे लावून सजविण्यात येतात. या पालख्या होळी पौर्णिमेला ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडतात, काही रंगपंचमीनंतर देवळात परततात, तर काही गावातून चैत्रीपर्यंत पालखी उत्सव साजरा केला जातो. त्याप्रमाणे, जिल्ह्यातील १,३७७ ग्रामदेवतेच्या पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडल्या आहेत. कोकणात गणेशोत्सव व शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असला, तरी या वर्षी कोरोनामुळे सण साजरा करण्याबाबत शासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. गावागावातूनही बैठका घेऊन प्रशासनाच्या सूचनेचे पालन करीत, शिमगोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करीत पालखी व होळीबाबत नियोजन गावागावातून करण्यात आले आहे. पालखीबरोबर मोजक्याच व्यक्तींची उपस्थिती ठेवण्यात येणार आहेत.
गतवर्षी होळी, रंगपंचमीनंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे काही गावांतील पालख्या रंगपंचमीला मंदिरात परतल्या होत्या. मात्र, या वर्षी कोरोना रुग्णवाढ सुरू असल्याने, सण साजरा करण्यासाठी शासनाने नियमावली जारी केली आहे. जेणेकरून गर्दी होऊ नये किंवा संसर्ग बळावू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांनी शासनाच्या नियमावलींचे पालन करून शिमगोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
चाैकट
खासगी, सार्वजनिक होळींची संख्या
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकांच्या हद्दीत १५ सार्वजनिक तर १०७ खासगी होळ्या पेटविण्यात येणार आहेत. रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत ७२ सार्वजनिक तर १३० खासगी होळ्या, गुहागर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ४६ सार्वजनिक व २३० खासगी, जयगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ४५ सार्वजनिक व १६६ खासगी, पूर्णगड पोलीस स्थानकाच्या हद्दीत ३० सार्वजनिक, ६५ खासगी, राजापूरमध्ये १०४ सार्वजनिक, १४२ खासगी, नाटे येथे १२ सार्वजनिक व ४२ खासगी, लांजामध्ये ९६ सार्वजनिक व ११४ खासगी, देवरूख येथे १२० खासगी, संगमेश्वर येथे ७९ सार्वजनिक, १६८ खासगी, चिपळूण येथे ९५, सार्वजनिक व १७० खासगी, सावर्डे येथे ४३ सार्वजनिक व २५० खासगी, अलोरे येथे ३१ सार्वजनिक, ३४५ खासगी, खेडमध्ये २२० सार्वजनिक व ३६० खासगी, दापोलीत १५० सार्वजनिक व ३७५ खासगी, दाभोळमध्ये २४ सार्वजनिक व ५७ खासगी, मंडणगड येथे ७५ सार्वजनिक व १६५ खासगी, बाणकोट येथे ३० सार्वजनिक व ७३ खासगी.
चाैकट
ग्रामप्रक्षिणेला बाहेर पडणाऱ्या पालख्या
रत्नागिरी शहर पाेलीस स्थानक १५ पालख्या ग्रामप्रदक्षिणेला बाहेर पडणार आहेत. रत्नागिरी ग्रामीण पाेलीस स्थानक ६८ पालख्या, गुहागर पाेलीस स्थानक ४६ पालख्या, जयगड पाेलीस स्थानक २० पालख्या, पूर्णगड पाेलीस स्थानक ५५ पालख्या, राजापूर ६१ पालख्या, नाटे २३ पालख्या, लांजा ९८ पालख्या, देवरूख ११२ पालख्या, संगमेश्वर ७९ पालख्या, चिपळूण ७२ पालख्या, सावर्डे ४० पालख्या, अलाेरे ३१ पालख्या, खेड ५७१ पालख्या, दाभाेळे १८ पालख्या, मंडणगड ५५ पालख्या, बाणकाेट १८ पालख्या.