लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पुरेशी झोप हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. मात्र, सध्या कोरोनाचे अनिष्ट सावट सर्वत्र पसरलेले आहे. सातत्याने होणाऱ्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग - व्यवसाय मंदीत आले आहेत. काहींच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारी आली आहे. एकंदरीत आर्थिक संकटाबरोबरच कोरोनामुळे वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक वर्षांपासून असलेले मोबाईलचे वेड यामुळे अनेकांची झोप उडाली आहे. या निद्रानाशाने अनेकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही बिघडू लागले आहे. अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे.
काहीजणांना रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहणे, मोबाईल खेळणे, लॅपटाॅपवर काम करत बसण्याची सवय असते. मात्र, यातून अनेक मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सध्या कोरोनामुळे जीवाची भीती, आर्थिक विवंचना यामुळे झोपेचे गणितच बिघडले आहे. साहजिकच वेळेवर झोप न घेण्यामुळे निद्रानाश हा बहुसंख्य व्यक्तींना सतावू लागला आहे. काही यावर झोपेच्या गोळ्यांचा पर्याय शोधू लागल्याने यातून आणखी त्रासांना आमंत्रण दिले जात आहे.
झाेप कमी झाल्याचे दुष्परिणाम
नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
शरिरातील विषारी घटकांचे उत्सर्जन जागरणामुळे होत नाही. ते शरिरात राहिल्याने हानीकारक.
डोकेदुखी, अपचन, पित्त आदी शारीरिक त्रास वाढतात.
चीडचीड होणे, दिवसा झोप येणे, एकाग्रता कमी होणे आदी मानसिक आजार वाढतात.
उशिरापर्यंत मोबाईलवर राहिल्याने डोळ्यांचे विकार वाढतात.
मोबाईलवर जास्त काळ राहिल्याने नैराश्य वाढल्याचे दिसून आले आहे.
झाेप का उडते?
सध्या कोरोनाची भीती सर्वांच्या मनात असल्याने भीती आणि काळजी ही दोन महत्त्वाची कारणे झोप उडवणारी आहेत. त्यातच भीती घालविण्यासाठी मोबाईलवर राहण्यामुळेही झोप उडते.
व्यसनाधिनतेमुळेही मेंदू रात्री श्रांत न होता उत्तेजित राहात असल्यानेही झोप उडते. त्यामुळे आरोग्यासाठी पुरेशा झोपेची गरज असली तरीही अशा व्यक्तींना ती मिळत नाही.
दुर्धर शारीरिक आजार, मानसिक आजारांमुळेही झोप लागत नाही. त्यामुळे शारीरिक उपचारांबरोबरच मानसिक उपचारही महत्त्वाचे.
डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे?
काही व्यक्ती रात्री झोप आली नाही तर औषधाच्या दुकानातून स्वत: झोपेच्या गोळ्या आणतात. मात्र, त्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने घेतल्या जात नसल्याने किती डोस घ्यायचा, कधी घ्यायचा याचे प्रमाण त्यांना कळत नाही. त्यामुळे एका गोळीने झोप आली नाही तर दुसरी घेतात. यातून त्याचे व्यसन लागते.
झोप येत नसेल तर त्याची कारणे वेगवेगळी असतात. डाॅक्टरांकडून ती शोधली जातात आणि मगच योग्य उपचार केले जातात. मात्र, मनाप्रमाणे झोपेच्या गोळ्या दीर्घकाळ घेतल्यास त्याचे मेंदू तसेच किडनीवर दुष्परिणाम होतात. काहीवेळा गोळ्या जीवावरही बेततात.
झोप आरोग्यासाठी टाॅनिक आहे. मात्र, ती मिळाली नाही तर त्यातून अनेक शारीरिक, मानसिक त्रास होतात. झोप न येण्याची कारणे वेगवेगळी असतात. ती शोधून मगच त्यावर उपचार केले जातात. मात्र, त्यासाठी डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत राहिल्यास हानीकारक ठरते. झोप येण्यासाठी मनातील काळजी काढून टाकायला हवी. दैनंदिन काम करत राहिल्यास शरीर आणि मेंदूही थकतो, त्यामुळे झोप येते. झोपण्याच्या आधी किमान दोन तास मोबाईल, टीव्ही दूर ठेवा, आहार हलका घ्या. प्रखर प्रकाश टाळा. महत्त्वाचे म्हणजे झोपणार आहे, अशी मेंदूला अर्धा तास आधी सूचना द्या.
- डाॅ. अतुल ढगे, मानसोपचार तज्ज्ञ, रत्नागिरी.
डमी
स्टार ८५४