चिपळूण : शहरासह तालुक्यात अजूनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नाही. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी कोरोना चाचणीवर अधिक भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार शनिवारी येथील बाजारपेठेत व्यापारी व कामगारांची कोरोना चाचणीसाठी मोहीम राबविण्यात आली. त्याला व्यापारी व कामगारांनी सहकार्य केले.
सध्या तालुक्यात ७३८ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यातील ५६४ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. तसेच १७४ जण उपचार घेत आहेत. सद्यस्थितीत बाजारपेठ सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवली जात आहे. मात्र आता विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी होत आहे. त्यातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः बाजरपेठेतील पानगल्ली, नाथ पै चौक, गांधी चौक, जुना बसस्थानक, चिंचनाका व मार्कंडी येथे मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारपेठ परिसरात अँटिजेन व आरटीपीसीआर तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
येथील तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू केली. नगर परिषदेपासून ही मोहीम सुरू झाली. त्यामध्ये ३२ जणांची तपासणी करण्यात आली. याशिवाय दोन मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून १२२ जणांची तपासणी केली. यामध्ये १५ जण पॉझिटिव्ह आढळले.
170721\img_20210717_133022.jpg
चिपळुणात व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचणी मोहीम