रत्नागिरी : कोरोना तपासणी केल्यानंतर अवघ्या दोन तासात सविस्तर चाचणी अहवाल आपल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीचे जिल्हा संक्रमण अधिकारी डाॅ. अर्जुन सुतार यांनी हे साॅफ्टवेअर तयार केले असून बुधवारपासून ही प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे आता चाचणी करणाऱ्यांना अहवाल नेण्यासाठी रुग्णालयात येण्याची गरज नाही.
रत्नागिरी : सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्याही वाढू लागली आहे. संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने आता सर्व दुकाने, आस्थापना, उद्योग, व्यवसाय, सरकारी कार्यालये, घरपोच सेवा देणारे आदींसाठी लसीकरण तसेच अँटिजेन, आरटीपीसीआर चाचण्या करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे आता चाचण्या करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. त्यामुळे चाचणीचे अहवाल वेळेवर देणे यंत्रणेला अशक्य होत आहे.
जिल्ह्यात चाचण्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून चाचण्यांसाठी केंद्रे वाढविण्यात आली आहेत. सध्या जिल्ह्यात जवळपास १०० केंद्रांवर चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, चाचण्यांबरोबरच अहवाल नेण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होत असल्याने पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. त्याचबरोबर चाचण्यांचे अहवालही वाढत्या संख्येमुळे विलंबाने मिळत आहेत.
यावर उपाययोजना म्हणून डाॅ. अर्जुन सुतार यांनी या दोन्ही चाचण्यांचे अहवाल थेट त्यांच्या मोबाईलवर जातील, यासाठी विशिष्ट साॅफ्टवेअर तयार केले आहे. हे साॅफ्टवेअर बुधवारपासून कार्यान्वित झाले असून चाचणी केल्यानंतर ती व्यक्ती पाॅझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, हा अहवाल चाचणी करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर लगेचच पाठविला जात आहे. त्यामुळे आता चाचणी करणाऱ्या व्यक्तीला अहवाल नेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात येण्याची गरज नाही.
कोविड तपासणी अहवाल आता रत्नागिरीत ऑनलाईन मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉ. सुतार यांनी एक यंत्रणा तयार केली असून याद्वारे आता आरटीपीसीआर व अँटिजेन रिपोर्ट ऑनलाईन मिळणार आहेत. हा ऑनलाईन रिपोर्ट सर्व कारणांसाठी वैध दस्तऐवज असेल.
- लक्ष्मी नारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी