लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील विविध ८७ केंद्रांवर या वयोगटातील २७०० व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. आतापर्यंत एकूण ५९,६७१ व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ११,४६० जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेवक आदींना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि महसूल कर्मचारी या पहिल्या फळीतील कोरोना योद्धांना लस देण्यात आली. त्याचप्रमाणे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना लस देण्यात आली. १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सह व्याधी (को माॅर्बिड) असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात आहे. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालये, दापोली, कळंबणी आणि कामथे या उपजिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण ७० केंद्रांवर लसीकरण प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे सर्च तालुक्यांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध झाली होती.
आता १ मार्चपासून ४५ वर्षांवरील सर्वच व्यक्तींना सरसकट लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून आता ती एकूण ८७ करण्यात आली आहे. गुरुवारपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे. पहिल्या दिवशी जिल्हाभरात ४५ वर्षांवरील २७०० जणांनी विविध केंद्रांवर लस घेतली. आतापर्यंत आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर व अन्य कर्मचारी, सह व्याधी असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा एकूण ५९,६७१ जणांना आतापर्यंत पहिला कोरोना डोस देण्यात आला आहे. त्याचबरोबर ११,४६० जणांनी दुसरी लस पूर्ण केली आहे. आता ४५ वर्षांवरील नागरिकांना सरसकट लस देण्यात येत असल्याने नागरिकांनी या सर्व केंद्रांपैकी सोयिस्कर असलेल्या ठिकाणी जावून लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
चौकट
गुरुवारपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना सरसकट लस देण्यात येत आहे. ही लस पहिल्या दिवशी २७०० जणांनी जिल्ह्यात घेतली. आतापर्यंत या वयोगटातील एकूण २६,८३३ जणांनी ही लस घेतली आहे. यात आरोग्य यंत्रणेतील तसेच दुसऱ्या फळीतील कोरोना योद्ध तसेच सह व्याधी असलेल्यांचा समावेश आहे.
चौक़ट
आतापर्यंत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्ये जावूनही ज्येष्ठ नागरिक लस घेत आहेत. गेल्या महिनाभरात २०,३३१ ज्येष्ठ नागरिकांनी काेरोना लस घेतली आहे.
चौकट
आतापर्यंत ५९,६७१ जणांना पहिला कोरोना डोस देण्यात आला आहे. त्याचबरोबर ११,४६० जणांनी दुसरी लस पूर्ण केली आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणात ताप येणे, मळमळणे आदी किरकोळ लक्षणे वगळता अन्य कुठलाही गंभीर परिणाम झालेला नाही.