चिपळूण : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या चोरट्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयात केले होते. या चोरट्याने शुक्रवारी सकाळी रुग्णालयातून पळ काढला. राहुल विलास जाधव (वय २६, रा. मुंबई) असे पळालेल्या चोरट्याचे नाव आहे. कोरोनाबाधित चोरट्याने रुग्णालयातून पळ काढल्याने आरोग्य यंत्रणा आणि पोलिसांची तारांबळ उडाली असून, टेरव येथे चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून पकडलापोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल चव्हाण याला चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पनवेल येथून अटक केली होती. कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. चार दिवसांपासून त्याच्यावर कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याने रुग्णालयात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची नजर चुकवून तो तेथून पळून गेला. शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून त्याचा शोध सुरू होता. गेल्या काही महिन्यांपासून येथे चोरी व घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल चव्हाण याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली होती.
अशातच त्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याने पोलिसांसह आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. त्याचा शोध चहुबाजूंनी घेतला जात होता. सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी कामी लागले आहेत. टेरव येथे चोरट्याला पोलिसांनी सापळा रचून पकडले आहे.