रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या इमारतीत कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या इमारतीतील २५ खोल्यांमध्ये ५० खाटांची सुसज्जता ठेवण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित असलेल्या पण लक्षणे नसलेल्या कुटुंबांचीही देखभाल करणे या कोरोना केअर सेंटरमुळे शक्य होणार आहे.कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय आणि इतर कोरोना केअर सेंटरवर ताण येऊ लागला आहे. अपुऱ्या मनुष्यबळावरच सध्या हे काम सुरू आहे. त्यातच जिल्ह्यातील ५४ पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य बाधित होऊ लागले आहेत.
शहर पोलीस ठाण्यातील ११ कर्मचारी बाधित झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काम करताना पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर बाधित होत असल्याने यासाठी स्वत: डॉक्टर असलेले आणि नुकतेच कोरोनाच्या अनुभवातून यशस्वीरित्या बाहेर आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कोरोना केअर सेंटरसाठी तातडीने पुढाकार घेतला असल्याने बुधवारपासून हे सेंटर सुरू करण्यात आले आहे.ज्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, त्यांच्यात लक्षणे नाहीत, अशा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना या कोरोना केअर सेंटरचा उपयोग होणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयातून आल्यानंतर ज्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार आहे, त्यांनाही या केअर सेंटरमध्ये ठेवता येणार आहे. त्याचप्रमाणे काही जणांच्या कुटुंबातील सदस्यही बाधित होत आहेत. अशांमध्ये लक्षणे नसल्यास त्यांनाही या केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. या केअर सेंटरसाठी इमारतीतील २५ खोल्यांमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण ५० खाटांची तसेच इतर सोय करण्यात आली आहे.या कोरोना केअर सेंटरची जबाबदारी पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्याकडे देण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत येथे दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. दिवसातून दोन वेळा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर येथे रुग्णांची तपासणी करणार आहेत. त्याचबरोबर परिचारिका आणि वॉर्डबॉय यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काळजीसाठी हे स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले आहे.
डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील बाधित पण लक्षणे नसलेल्या सदस्यांसाठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. अशा कर्मचाऱ्यांना मानसिक दिलासा मिळणार असून, त्याचे मनोधैर्य वाढणार असल्याने ते पुन्हा नव्या जोमाने कर्तव्यावर रूजू होतील.- अनिल गंभीर,पोलीस निरीक्षक, रत्नागिर
दायित्त्वाचे दर्शनपोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी आगळावेगळा उपक्रम राबवून आपल्या कर्मचाऱ्यांप्रति असलेल्या दायित्त्वाचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच दुणावला आहे.