मनोज मुळ्येरत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रावर काही का काही परिणाम झाले. काही व्यवसाय पूर्णपणे बंद झाले तर काही नवीन व्यवसाय उदयास आले. असाच एक बदल झाला तो बारमधील हजेरीवर. लॉकडाऊन काळात बार बंद असताना घरीच बसण्याची सवय लागलेल्या लोकांची पावले आता बारकडे वळत नाहीत. त्याऐवजी आता लोक घरातच बसून मद्यपान करत असल्याचे समोर येत आहे. आता बार सेवेत हजर झाले असले तरी त्यातील गर्दी ५० टक्क्यांहून अधिक घटली आहे.मार्च महिन्यापासून अनेक गोष्टींमध्ये बदल झाले. सुरूवातीच्या काळात कोरोनाची तीव्रता वाढत असताना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. त्यावेळी बार, वाईन मार्ट बंद झाले. जिकडे-तिकडे याचीच चर्चा अधिक होती.
सोशल मीडियावर मीम्सनी धुमाकूळ घातला होता. बाकी काही नको, किमान वाईन मार्ट तरी सुरू करा, असा मुद्दा अनेक बाजूंनी पुढे आणला गेला. सरकारनेही महसूल बुडतो असे कारण देत वाईन मार्ट सुरू करण्याला परवानगी दिली.अनेक महिने बार बंद असल्याने मद्य पिणाऱ्यांची संख्या घटली नाही, उलट बाहेर गेल्यावर कोरोनाची भीती आहे म्हणून घरातच मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढली. आता बार उघडून अनेक दिवस झाले असले, तरी बारमध्ये पहिल्यासारखी गर्दी होत नाही. नेहमी येणारे जवळपास ५० ते ६० टक्के लोक आता बारमध्ये येत नाहीत. कोरोनामुळे लोक घरीच मद्यपान करत असल्याने बारमधील गर्दी घटली असल्याचे अनेक बारमालकांनी सांगितले.नाईलाजाने का होईना..कोरोना दाखल झाल्यापासून बार बंद झाले. बाहेर पडल्यास कोरोनोचा धोका असल्याने अनेक पुरूषांना नाईलाजाने का होईना पण घरातच मद्यपान करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे बारमध्ये नियमित जाणारेही आता आम्ही घरीच बसतो, असे आवर्जून सांगतात.व्यवसायावर मोठा परिणामएका बारशी निगडीत अनेक पद्धतीचा व्यवसाय चालतो. स्टार्टर म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ, बारमधील कामगार, जेवण बनवणारे असे अनेकजण त्यावर अवलंबून असतात. मात्र, आता बारमधील गर्दी कमी झाल्यामुळे हे सर्व गणित जुळवायचे कसे, असा प्रश्न आता हॉटेल मालकांसमोर उभा आहे. लोकांची गर्दी कमी होत असल्याने बारचा कोट्यवधींचा व्यवसाय आता खूप कमी होऊ लागला आहे.अहो, घरीच बसाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या कामाखेरीज बाहेर पडू नका, घरातच बसा... या सरकारच्या आवाहनाची खूप खिल्ली उडवली गेली. मंदिरे, वाचनालये उघडण्याआधी वाईन मार्ट सुरू झाल्याने घरीच बसा या वाक्यावर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल झाले आणि नंतर ते प्रत्यक्षातही आले.