गणपतीपुळे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरकारकडून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आलेल्या पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांनी फुलून जाणारा गणपतीपुळेचा समुद्रकिनारा सुनासुना झाला होता.गेले काही दिवस लॉकडाऊन होणार याच कारणामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात गर्दी कमी झाली होती. मात्र कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे आलेल्या पर्यटकांना आपण कुठे तरी अर्ध्यावरच अडकून राहण्यापेक्षा आपल्या घरी पोहोचलेले बरे या कारणास्तव गणपतीपुळ्यातील पर्यटकांनी आपापल्या गावी जाणे पसंत केले.तसेच सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार असल्याचे जाहीर होताच पुन्हा एकदा गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील स्वयंभू श्रीगजाननाचे मंदिर दर्शनासाठी बंद होणार की काय? असा प्रश्न येथील स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकांना सतावत आहे. जर दर्शनासाठी मंदिर पुन्हा एकदा बंद करण्यात आले तर येथील स्थानिक व्यापारी यांचे फार मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच मॉल व दुकानेसुद्धा बंद राहणार असल्यामुळे खरेदीसाठी दुकानातून गर्दी झाली होती. हे नवीन निर्बंध ३० एप्रिलपर्यंत राहणार आहेत. त्यामुळे सध्या गणपतीपुळे परिसरात लॉकडाऊनची चर्चा पाहण्यास मिळत आहे. पुन्हा एकदा येथील लॉज व्यवसाय, हॉटेल्स व्यवसाय ठप्प होणार आहेत. पुन्हा एकदा आर्थिक गणित बिघडणार असल्याचे बोलले जात आहे.श्रींचे मंदिर बंदनव्या सरकारी नियमांमुळे अनिश्चित काळासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. सोमवारी सायंकाळी ७.३० नंतर मंदिर बंद करण्यात आले. स्थानिक भाविकांनाही दर्शन मिळणार नसल्याने काहीसे नाराजीचे वातावरण आहे.चौपाटीही बंदनव्या नियमांनुसार शनिवार, रविवारी समुद्र चौपाटी पूर्ण बंद ठेवली जाणार आहे. शुक्रवार सायंकाळ ते सोमवार सकाळपर्यंत चौपाटीवर प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
corona virus : मिनी लॉकडाऊनमुळे गणपतीपुळे सुनेसुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 12:07 PM
corona virus GanpatipuleTemple : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे सरकारकडून मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आलेल्या पर्यटकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पर्यटकांनी फुलून जाणारा गणपतीपुळेचा समुद्रकिनारा सुनासुना झाला होता.
ठळक मुद्दे पर्यटकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात, मंदिर पुन्हा दर्शनासाठी बंदगणपतीपुळे परिसरात शुकशुकाट