रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत असले तरी अनेकजण जिल्ह्यात बाहेरहून दाखल होत आहेत.
जिल्हाभरात हजारोंच्या संख्येने मुंबई, पुणे येथून नागरिक दाखल झाले आहेत. यातील अनेकजण आपण बाहेरगावाहून आल्याची माहितीही लपवत असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हेच मोठे आव्हान आता उभे राहिले आहे. त्यासाठी कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यजनता कर्फ्यूह्ण यशस्वीही झाला. पण, बाहेर गावाहून येणारे लोंढे अजूनही थांबलेले नाहीत. कोकणातील बहुतांशी लोक मुंबई, पुणे येथे वास्तव्याला आहेत.
या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या भागातून येणाऱ्या नागरिकांना थांबविणे गरजेचे आहे. रेल्वे, एस्. टी. बससेवा बंद असली तरी अनेकजण खासगी वाहनाने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होत आहेत.सुटी पडल्याने अनेकजण आपल्या गावी मौजमजा करण्यासाठी येत असल्याचेही पुढे येत आहे. त्याचबरोबर परदेशात कामानिमित्त स्थायिक झालेले बहुतांशी नागरिक मायदेशी परतत आहेत. यामध्ये दुबई व आखाती भागातून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या सर्वांना थांबविणे गरजेचे आहे.
अनेकजण जिल्ह्यात दाखल होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरगावातून आल्यानंतर त्याची माहिती संबंधित आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पण, या आवाहनाला कमी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. अनेकजण ही माहिती लपविताना दिसत आहेत.ही माहिती घेण्याचे काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माहिती विचारल्यास त्यांनाच जाब विचारण्यात येत आहे. त्यामुळे ही माहितीदेखील मिळणे मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग तत्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली असून, नातेवाईकांनीही आपल्या आप्तेष्टांना गावी न येण्याचे आवाहन करण्याची वेळ आली आहे.